विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरल्याने राज्यांकडून निर्बंध शिथिल केले जात असतानाच डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका उभा राहिला आहे. तिसर्या लाटेची शक्यता गृहित धरून केंद्राने यापूर्वीच राज्यांना सावध केले आहे. महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा धोकादायक डेल्टा व्हेरिएंटचे ५० टक्के रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात डेल्टाचे सर्वाधिक रुग्ण असल्याने राज्य सरकारनेही कडक नियम लागू केले आहेत.
देशातील ३५ राज्यांमधील १७४ जिल्ह्यात डेल्टा व्हेरिएंट आढळला आहे. तर नुकत्याच सापडलेल्या डेल्टा प्लस म्युटेशनचे आतापर्यंत १२ राज्यांमध्ये रुग्ण आढळले आहेत. या राज्यांत गोळा केलेल्या ४९ नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळला आहे. केंद्र सरकारने डेल्टा प्लस व्हेरिएंट गंभीर असल्याचे नुकतेच घोषित केले होते.
राष्ट्रीय महामारी नियंत्रण केंद्राचे संचालक डॉ. सुजित कुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, देशात आतापर्यंत २१,१०९ नमुन्यांमध्ये गंभीर व्हेरिएंट सापडला आहे. त्यामध्ये अल्फा ३९६९, बिटा १४९, ग्यामा १ आणि डेल्टा व कापाचे व्हेरिएंट १६२३८ नमुन्यांत आढळले आहेत.
महामारीच्या दुसर्या लाटेपूर्वी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये सर्वात जास्त अल्फा व्हेरिएंट आढळला होता. परंतु मे आणि जूनमध्ये ९० टक्के नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट सापडल्याला दुजोरा मिळाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे १२० म्युटेशन आढळले आहेत. त्यातील ८ व्हेरिएंट गंभीर असून, तेच भारतीयांना बाधित करत आहेत.
१४ व्हेरिएंटबद्दल अद्याप शास्त्रज्ञांना अधिक माहिती मिळालेली नाही. त्यापैकी एक डेल्टा प्लस व्हेरिएंटही आहे. गेल्या वर्षी डिसेंबर २०२० मध्ये देशातील एका जिल्ह्यात डेल्टा व्हेरिएंटने बाधित एक रुग्ण आढळला होता. त्यानंतर मार्च २०२१ पर्यंत डेल्टा ५४ जिल्ह्यांमध्ये आढळला होता. आता तो १७४ जिल्ह्यात आढळलेला आहे. सर्वात आधी हा व्हेरिएंट महाराष्ट्रात सापडला होता. डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्णही वाढत आहेत. डेल्टा प्लसचे महाराष्ट्रात २०, तामिळनाडूत ९, मध्य प्रदेशात ७, पंजाबमध्ये २, गुजरातमध्ये २, केरळमध्ये ३, आंध्र प्रदेश-ओडिसा-राजस्थान-जम्मू काश्मीर आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.
महाराष्ट्रात एकाचा मृत्यू
महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटची बाधा झालेल्या ८० वर्षी महिलेचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे
देशात हा दुसरा आणि महाराष्ट्रात पहिला मृत्यू आहे. राज्यात डेल्टा व्हेरिएंटने बाधित एकूण २१ रुग्ण आहेत. मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्येसुद्धा एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उज्जैनमध्ये दोन रुग्ण डेल्टा प्लस व्हेरिएंटने बाधित झाले होते. त्यापैकी एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.