विशेष प्रतिनिधी, मुंबई
भारतातील तरुणांच्या कामगिरीची विदेशातील प्रतिष्ठित पुरस्कारांनी कायमच दखल घेतली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती, कला यासारख्या अनेक विषयांमध्ये भारतीयांची पाठ थोपटण्यात आली आहे. मात्र दिल्लीतील १५ वर्षांच्या मुलाला चक्क सामाजिक कार्यासाठी ब्रिटनच्या प्रतिष्ठित डायना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी आणि ते बदल कायम ठेवण्यासाठी ईशान कपूरला हा पुरस्कार देण्यात आला आहे. ब्रिटनमधील वेलिंग्टन कॉलेजमध्ये तो शिक्षण घेत आहे. तो मूळचा दिल्लीचा आहे. ईशान त्याचे सामाजिक कार्य व मानवतेच्या प्रसाराचे प्रयत्न दखलपात्र ठरले आहेत.
ब्रिटनचा डायना पुरस्कार हा सर्वोच्च मानला जातो. ईशान हा दिल्लीतील रामकृष्ण आश्रमासोबत काम करतो. तो उपेक्षित मुलींना शाळेचा गणवेश मिळवून देण्याचे काम करतो. ईशानने जवळपास पाच लाख रुपये गोळा केले. तसेच शिक्षण आणि विद्यार्थ्यांना १०० लॅपटॉप व टॅबलेट मिळवून दिले. त्याने यासाठी एक अभियान हाती घेतले आणि ते पूर्णत्वास नेले. एवढेच नाही तर राष्ट्रव्यापी लॉकडाऊन असताना कुणाच्याही अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून आनलाईन वर्गांची पूर्ण काळजी ईशानने घेतली.
पुरस्काराचे महत्त्व
डायना पुरस्कार हा वेल्सची राजकुमारी डायना हिच्या स्मृतित दिला जातो. हा पुरस्कार त्यांच्याच नावाने सुरू करण्यात आलेल्या संस्थेच्या वतीने दिला जातो. यात त्यांची दोन्ही मुले द ड्यूक आफ कॅम्ब्रिज आणि द ड्युक आफ ससेक्स यांचे सहकार्य मिळत असते.