नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोक्सोप्रकरणात समर्पक पुरावे नसल्यामुळे खासदार बृजभूषण सिंहविरुद्धचे गुन्हे रद्द करावेत, अशी याचिका दिल्ली पोलिसांनी न्यायालयात केली आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट अर्थात सबळ पुराव्याअभावी गुन्ह्याचा तपास बंद करण्याची अनुमती मागितली आहे.
भारतीय कुस्ती परिषदेचे प्रमुख आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारले आहे. नवी दिल्ली येथील जंतरमंतरवरील आंदोलनाला संपूर्ण देशभरातून पाठींबा मिळाला. आंदोलन चिघळू नये म्हणून क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी मध्यस्थी केली. त्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तसेच दिल्ली पोलिसांनीदेखील सक्रियता दाखवित या प्रकरणी कार्यवाही सुरू केली आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी अनेक कांगोरे तपासले आणि आज अखेर राऊज एवेन्यू कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. यामध्ये दिल्ली पोलिसांनी अल्पवयीन कुस्तीपटूच्या लैंगिक छळ प्रकरणी दिल्ली पोलिसांनी भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांना क्लीन चिट दिली आहे.
विविध तक्रारींवरून प्रकरणे दाखल
सात कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांवरून दिल्ली पोलिसांनी गुरुवारी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध दोन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सहा प्रौढ महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या गुन्ह्यात राऊस अॅव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले. तर दुसरे आरोपपत्र पतियाळा न्यायालयात अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आले. अल्पवयीन मुलाने लावलेल्या आरोपांमध्ये दिल्ली पोलिसांनी बृजभूषण यांना क्लीन चिट देत एकप्रकारे दिलासा प्रदान केला आहे.