नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी येथे रात्री उशीरा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. पवार-पटेल यांनी राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर प्रथमच मोदी-शहा यांची एकत्रित भेट घेतली. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निघून गेल्यानंतर या मान्यवरांची बैठक झाली आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा झाली यावरुन सध्या चर्चांना उधाण आले आहे.
भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रील लोकशाही आघाडी (एनडीए)च्या घटक पक्षांची बैठक येथे बोलावली होती. या बैठकीला ३८ राजकीय पक्ष उपस्थित होते. या बैठकीला शिवसेना (शिंदे गट) चे प्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. शिंदे यांनी शिवसेनेत तर पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करुन राज्यात सत्तेमध्ये सहभाग घेतला आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. त्यानंतर आता एनडीएच्या बैठकीच्या निमित्ताने शिंदे आणि पवार हे दिल्लीत दाखल झाले.
एनडीएची बैठक झाल्यानंतर विविध पक्षांचे प्रमुख हे बैठकीच्या स्थळावरुन निघाले. अशाच पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा निघून गेले. त्यानंतर पवार आणि पटेल यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांची एकत्रित भेट घेतली. यावेळी या नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. खासकरुन राज्यातील आगामी काळातील राजकारण आणि राज्यातील विविध विकास कामे तसेच सहकार क्षेत्र यावर या मान्यवरांनी चर्चा केली. ही भेट तब्बल अर्धा तास चालली. या भेटीत अनेक महत्त्वाचे निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे. राज्याच्या राजकारणात आगामी काळातील वाटचालींबाबत काही महत्त्वाची चर्चा आणि निर्णय झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.