नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्ली येथे आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटुंवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा सर्व स्तरातून विरोध होत आहे. देशासाठी पदके जिंकून देणाऱ्या खेळाडूंना पोलिसांनी अशी वर्तणूक देणे योग्य नसल्याची ओरड होत असताना दिल्ली पोलिस उपायुक्त सुमन नलवा यांनी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे. कुस्तीपटुंच्या तमाशेयुक्त वागणुकीमुळे कारवाई करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध कुस्तीपटूंनी दंड थोपटले आहेत. त्यांच्याद्वारे खेळाडूंचे मानसिक, शारीरिक शोषण होत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, अद्याप ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. परिणामत: खेळाडुंचे आंदोलन कायम आहे. अशात रविवारी नव्या संसद भवनाच्या लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी पोलिसांनी कुस्तीपटूंना आंदोलनास्थळावरून अत्यंत अपामानास्पदरित्या उचलून नेले होते. रविवारी पोलिसांनी केलेल्या त्या कारवाईवर टीकेची झोड उठली आहे.
देशासाठी खेळणाऱ्यांना अशी वागणूक देणे पूर्णत: अयोग्य असल्याची भावना देशभरातून व्यक्त होत आहे. मात्र, अशी कारवाई करण्यासाठी पोलिसांना उद्युक्त केल्याचे सांगत दिल्लीच्या पोलिस उपायुक्त सुमन नलवा यांनी कुस्तीपटूंनाच एकप्रकारे दोषी ठरविले आहे. या घटनेबाबत अधिक सांगताना त्या म्हणाल्या,‘आपल्या नव्या संसदेचे उद्घाटन होते. त्यामुळे कोणतीही सुरक्षा यंत्रणा या प्रकारच्या आंदोलनाला परवानगी देऊ शकत नाही. त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. पण त्यांनी काहीही ऐकायला नकार दिला. त्यानंतरही जेव्हा त्यांनी असं करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना ताब्यात घ्यावे लागले. असे करताना त्यांनी खूप विरोध केला.
आमच्या महिला पोलिसांनीच त्यांना ताब्यात घेतले. त्यांना खूप प्रयत्न करावे लागले. कारण हे सगळे अॅथलिट आहेत. त्यांनी तिथे झोपून वगैरे खूप तमाशे केले. त्यानंतरही आमच्या महिला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि संध्याकाळी त्यांना सोडून दिले.’
सर्व सुविधा पुरविण्यात आल्या
जंतरमंतरवर गेल्या ३८ दिवसांपासून हे सगळे कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. दिल्ली पोलिस त्यांना बऱ्याच सुविधा देत आहेत. या सुविधा आम्ही सामान्य परिस्थितीत आंदोलकांना देत नाही. यांच्याकडे जेनसेट्स, कॅन्टेज, पाण्याची सुविधा होती. हे कुस्तीपटू तिथे सलग थांबतही नव्हते. ते येत होते, जात होते. त्यांचे काही हितचिंतक किंवा सहकारी तिथे बसायचे. हे सगळं चालत होतं. आम्ही त्यांच्याकडून मागणी केल्या जाणाऱ्या सर्व सुविधा पुरवत होतो, असे नलवा यांनी म्हटले आहे.
Delhi Police Wrestlers Protest Action