नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा निवडणुकीला अद्याप एक वर्ष बाकी असले तरीही दिल्लीत मात्र जोरदार रण पेटले आहे. हे रण सरकार आणि कुस्तीपटू यांच्यात पेटले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या कुस्तीपटूंनी नव्या संसद भवनाच्या दिशेने कूच करताच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतीय कुस्तीपटूंनी आंदोलन छेडले आहे. महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. त्यासंदर्भात अनेक दिवसांपासून जंतरमंतरवर आंदोलन सुरू असून ब्रिजभूषण यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी या खेळाडूंनी केली आहे. अनेक संघटनाही त्यांच्यासोबत आंदोलनात उतरल्या आहेत.
विविध भाजपविरोधी राजकीय पक्षांनीही त्यांना साथ दिली आहेत. तर खाप पंचायतनेही कुस्तीपटूंसोबत सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. हे आंदोलन शांततेत सुरू असताना रविवारी सर्व आंदोलकांनी नव्या संसद भवनावर धडक देण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपला निर्णय जाहीर केल्यावर देशातील अनेक संघटना त्यांच्यासोबत जुळल्या.
रविवारी सकाळी संसद भवनाचा उद्घाटन सोहळा सुरू होण्यापूर्वीच कुस्तीपटू त्या दिशेने निघाले. मात्र पोलिसांनी त्यांना मध्येच रोखले. तिथे काही क्षण पोलीस आणि खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. अखेर पोलिसांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कुस्तीपटूंवर गुन्हे दाखल केले. यामध्ये विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया या नॅशनल हिरोंचा समावेश आहे.
ही कलमे
कुस्तीपटूंवर कलम १४७ (दंगल), कलम १४९ (बेकायदेशीर सभा), १८६ (सरकारी कामात अडथळा आणणे), १८८ (आदेशाची अवज्ञा करणे), ३३२ आणि ३५३ सह, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्ली पोलिसांची तत्परता
ब्रिजभूषण यांच्याविरोधात आंदोलन सुरू केल्यानंतर वारंवार मागणी करून गुन्हे दाखल करायला दिल्ली पोलिसांना सात दिवस लागले. मात्र देशाची मान उंचावणाऱ्या कुस्तीपटूंवर गुन्हे दाखल करायला सात सातही लागले नाहीत, एवढी तत्परता दिल्ली पोलिसांनी दाखवली, अशी टीका विनेश फोगटने केली.
अटक करून सुटका
साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांना अटक करून काही तासांनी पोलिसांनी सोडून दिले. तर बजरंग पुनिया याला रात्री उशिरा सोडले. आमचा काहीही गुन्हा नसताना आम्हाला अटक करून गुन्हे दाखल करण्यात आले, असे पुनियाने म्हटले आहे.
Delhi Police Wrestler Protest FIR Registered