नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी लैंगिक-शारीरिक शोषण केल्याचा आरोप करत कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारले आहे. या प्रकरणी आता ब्रिजभूषण सिंह यांनी केलेल्या शोषणसंबंधित पुरावे सादर करा, अशी नोटीस पोलिसांनी कुस्तीपटूंना बजावली आहे.
महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून ब्रिजभूषण सिंह यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कुस्तीपटूंनी पुकारलेले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरीही या प्रकरणी आरोपीविरोधात लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी कुस्तीपटूंनी केली आहे. दरम्यान, याप्रकरणातील पुढील पाऊल म्हणून तक्ररादारांची चौकशी करण्यात येत असून सीआरपीसीच्या कलम ९१ अंतर्गत दोन महिला कुस्तीपटूंना ५ जून रोजी नोटीस बजावण्यात आली होती.
या नोटीसीला उत्तर देण्याकरता एक दिवसाचा कालावधी देण्यात आला होता. पोलिसांनी कुस्तीपटूंचीही चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्यांना ऑडियो, व्हिडीओ, आणि फोटो पुरावे म्हणून देण्यास सांगण्यात आले आहे, इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. तसंच, एका महिला कुस्तीपटूला मारलेल्या मिठीचाही फोटो पोलिसांनी मागितला आहे.
चार वर्षांनंतर आंदोलन
लैंगिक छळाच्या या घटना २०१६ ते २०१९ या काळात २१, अशोका रोड येथील डब्ल्यूएफआय कार्यालयात आणि ब्रिजभूषण सिंग यांच्या बंगल्यावर घडल्या आहेत. तसेच, काही घटना परदेशात स्पर्धांदरम्यान घडल्या आहेत. एका महिला कुस्तीपटूने परदेशात मोठे पदक जिंकल्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांनी तिला १० ते १५ सेकंद मिठी मारली होती. यावेळी ब्रिजभूषण अधिक जवळ येऊ नयेत म्हणून संबंधित खेळाडूने तिच्या स्तनांवर हात ठेवला. या मिठीचा फोटो पोलिसांनी मागितला आहे. मात्र, हा संपूर्ण प्रकार चार वर्षांनंतर आंदोलनाच्या स्वरूपात का पुढे आला, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
Delhi Police Notice Women Wrestler Protest