नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. दुसरीकडे, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी नवीन संसद भवनावर मोर्चा काढण्याची घोषणा केली. याचदरम्यान, दिल्ली पोलिसांनी दांडगाई करीत कुस्तीपटू फोगट बहिणींना ताब्यात घेतले आहे. तसेच, जंतर मंतरवरील त्यांचे आंदोलन तंबूही हटवले आहेत.
दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर शेतकरी कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ जमले आहेत. महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने सांगितले की, आम्ही शांततेने मोर्चा काढत होतो, मात्र पोलिसांनी आम्हाला जबरदस्तीने ओढले आणि ताब्यात घेतले. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तेथे मुक्कामासाठी लावलेले तंबू हटवले आहेत. कुस्तीपटूंचे आंदोलन चिरडण्याचा हा प्रकार असल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे.
कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ दिल्लीला जाण्यापासून पोलिसांनी रोखल्यानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, ही वैचारिक लढाई आहे, आम्ही जंतरमंतरवर जाणार होतो, तेथून संसदेत जाणार होतो, पण पोलिसांनी आम्हाला इथे रोखले आहे, आम्ही आहोत. चार वाजेपर्यंत बसू. त्यानंतर बघू काय करायचे.
कुस्तीपटू बजरंग पुनियाने सांगितले की, आज नक्कीच महापंचायत होणार आहे. आम्ही आमच्या स्वाभिमानासाठी लढत आहोत. ते आज संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करत आहेत, पण देशातील लोकशाहीची हत्या करत आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आमच्या लोकांना सोडावे, असे आवाहन आम्ही प्रशासनाला करतो.
जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या पैलवानांच्या समर्थनार्थ पंचायत आयोजित करण्यासाठी शेतकरी गाझीपूर सीमेवर पोहोचले आहेत. भारतीय किसान युनियनने गाझीपूर सीमेवर पंचायत घेण्याची घोषणा केली होती. गाझीपूर सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, गाझीपूर सीमेवर कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तपासणीनंतर वाहनांना उत्तर प्रदेशहून दिल्लीत प्रवेश दिला जात आहे. शेतकऱ्यांना दिल्लीच्या दिशेने जाण्यापासून रोखण्यासाठी बॅरिकेडिंग लावण्यात आले आहे.
कुस्तीपटू साक्षी मलिक हिने वस्तुस्थितीची माहिती व्हिडिओद्वारे दिली आहे. हा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://twitter.com/SakshiMalik/status/1662676135115907072?s=20
Delhi Police Arrest Wrestlers jantar mantar protest