नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संसदेच्या विशेष अधिवेशनाचे कामकाज १८ सप्टेंबरपासून जुन्या इमारतीतच सुरू होणार आहे. मात्र, गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संसदेचे पहिले कामकाज १९ सप्टेंबर रोजी नवीन संसद भवनात होणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने हा दावा केला आहे. या वर्षी २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करून ते देशवासियांना समर्पित केले होते.
५ ऑगस्ट २०१९ रोजी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांनी सरकारला नवीन संसद भवन बांधण्याची विनंती केली होती. यानंतर १० डिसेंबर २०२० रोजी पंतप्रधान मोदींनी संसदेच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली. नवनिर्मित संसद भवन विक्रमी वेळेत दर्जेदार पूर्ण झाले आहे.
संसदेची सध्याची इमारत १९२७ मध्ये पूर्ण झाली, जी आता जवळपास १०० वर्षे जुनी होणार आहे. या इमारतीत सध्याच्या गरजेनुसार जागेची कमतरता होती. दोन्ही सभागृहात खासदारांसाठी सोयीस्कर आसन व्यवस्थेचाही अभाव होता. हे लक्षात घेऊन लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांनी संसदेसाठी नवीन इमारत बांधण्यासाठी सरकारला आग्रह धरणारे ठराव पारित केले होते. नवनिर्मित संसद भवन भारताच्या गौरवशाली लोकशाही परंपरा आणि घटनात्मक मूल्यांना अधिक समृद्ध करेल.
नवे संसद हे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे, जे सदस्यांना त्यांचे कार्य अधिक चांगल्या प्रकारे पार पाडण्यास मदत करेल. नवीन संसद भवनात ८८८ सदस्य लोकसभेत बसू शकतील. संसदेच्या सध्याच्या इमारतीत लोकसभेतील ५४३ आणि राज्यसभेतील २५० सदस्यांसाठी आसनव्यवस्था आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन संसदेच्या नव्याने बांधलेल्या इमारतीत लोकसभेतील ८८८ आणि राज्यसभेतील ३८४ सदस्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन लोकसभेच्या सभागृहात होणार आहे.
Delhi New Parliament Building Special Session Ganesh Chaturthi