नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पश्चिम दिल्लीमधील मुंडका मेट्रो स्थानकाजवळील इमारतीत शुक्रवारी सायंकाळी लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३० वर पोहोचला आहे. १२ हून अधिक नागरिक होरपळे असून, त्यांच्यावर संजय गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या इमारतीत अनेक नागरिक अडकल्याची भीती असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ३० मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून, शोध मोहीम आणि बचावकार्य सुरू असल्याची माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
रुग्णालयाच्या बाहेर नागरिकांची एकच गर्दी उसळली आहे. आपल्या कुटुंबीयांबद्दल जाणून घेण्यासाठी अनेक जण रुग्णालयाच्या बाहेर वाट पाहात आहेत. चहू बाजूला गोंधळाचे वातावरण आहे. दिल्ली अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ४.४० मिनिटांनी आग लागल्याची माहिती मिळाली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ३० अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले आहेत. पीडित नागरिकांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा घटनास्थळी उपलब्ध करून देण्यात आली.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, ही चार मजली इमारत आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. तिथे एक सीसीटीव्ही कॅमेरा आणि राऊटर बनवण्याच्या कंपनीचे कार्यालय आहे. इमरतीच्या एका गोदामात पर्फ्युम आणि देशी तूप असल्याने संपूर्ण गोदामात आग वाऱ्यासारखी पसरली. दुर्घटनेच्या वेळी इमारतीत जवळपास २०० नागरिक होते. एका खोलीत ५०-६० नागरिकांची बैठक सुरू होती. खिडक्यांच्या काचा फोडून फसलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले.
पोलिस उपायुक्त एस. शर्मा म्हणाले, की गुन्हा दाखल केल्यानंतर इमारतीचे मालक हरीश गोयल आणि वरुण गोयल यांना अटक करण्यात आली आहे. बचावकार्य सुरू असल्याने आणखी मृतदेह हाती लागण्याची शक्यता आहे. मृतदेह ९० टक्के जळाल्याने त्यांची ओळख पटवण्यासाठी न्यायवैद्यक पथकाची मदत घेतली जाणार आहे. इमारतीला ना हरकत प्रमाणपत्र मिळालेले नव्हते असे तपासात निष्पन्न झाले आहे. इमारतीचे मालक मनीष लाकडा यांची चौकशी करण्यात येणार आहे. तपास पूर्ण झाल्यावर संबंधितांवर गुन्हे दाखल केले जणार आहेत.
ही दुर्घटना मुख्य मार्गावर झाली असल्याने बचावकार्यामुळे पूर्ण परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांकडून कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला जात होता. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मुंडका ते संजय गांधी रुग्णालयापर्यंत ग्रीन कॉरिडोअर करण्यात आला होता. वाहतुकीची कोंडी आणि गर्दी मुळे जखमींना शोधण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला.
https://twitter.com/ANI/status/1525356837637214208?s=20&t=EaoSv32QqFM9CSyEvLt3vg