नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा रेल्वेमार्गासाठी (अंदाजे ३००० किमी मार्गावर) कवच निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत आणि या मार्गांवर काम सुरू आहे. भारतीय रेल्वे यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल (DPR) आणि आणखी ६००० किलोमीटर मार्गासाठी तपशीलवार अंदाज तयार करत आहे.
कवच च्या अंमलबजावणीसाठी आतापर्यंत ३५१.९१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कवचच्या स्टेशन उपकरणासह रेल्वे रूळसाठीच्या तरतुदीची किंमत अंदाजे ५० लाख रुपये प्रति किलोमीटर आहे. गाडीवर कवच उपकरण बसवण्यासाठी अंदाजे ७० लाख रुपये प्रति लोको खर्च आहे. सध्या तीन भारतीय ओईएम कंपन्या कवचसाठी मंजूर केल्या आहेत. कवचची क्षमता आणि त्याची अंमलबजावणी वाढविण्यासाठी आणखी वेंडर्सचा शोध घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
असे आहे कवच
कवच ही स्वदेशी विकसित केलेली ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (ATP) प्रणाली आहे. कवच ही एक उच्च तंत्रज्ञानाने युक्त अशी एक प्रणाली आहे, ज्याला सर्वोच्च पातळीचे सुरक्षा प्रमाणपत्र आवश्यक आहे. कवच विशिष्ट वेग मर्यादेत रेल्वे चालवण्यासाठी लोको पायलटला मदत करते आणि खराब हवामानात रेल्वेला सुरक्षितपणे धावण्यास मदत करते. कवच आतापर्यंत १४६५ किमी मार्गावर आणि १२१ लोकोमोटिव्ह दक्षिण मध्य रेल्वेवर (इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट रेकसह) तैनात केले गेले आहे.