नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीने घवघवीत यश मिळविले आहे. म्हणजेच आता राज्यापाठोपाठ महापालिकेतही आपचा झेंडा फडकला आहे. मात्र, आता महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सदस्यांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत कुणाला यश मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आप आणि भाजप यांच्यातील द्वंद्वामुळे ही निवडणूकही आता अतिशय चुरशीची होणार आहे.
दिल्ली महापालिकेच्या महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सहा सदस्यांची निवडणूक येत्या ६ जानेवारीला होणार आहे. नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी दिलेल्या निर्देशानुसार, दिल्ली महापालिकेची पहिली बैठक ६ जानेवारीला होणार आहे. यादरम्यान सर्वप्रथम सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा शपथविधी होणार असून त्यानंतर महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक होणार आहे.
यावेळी या निवडणुकीत आम आदमी पक्षाने सर्वाधिक १३४ जागा जिंकल्या आहेत, तर भाजपचे केवळ १०४ नगरसेवक निवडून आले आहेत. महापालिकेत बहुमताचा आकडा १२६ आहे. याचा अर्थ आम आदमी पक्षाकडे सध्या बहुमतापेक्षा आठ नगरसेवक अधिक आहेत. असे असतानाही महापौरपदाच्या निवडणुकीत काय होणार, असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजप पुन्हा आकड्यांच्या खेळात आम आदमी पार्टीला पराभूत करण्याची तयारी करत आहे की केजरीवाल महापालिकेमध्येही आपले सरकार स्थापन करणार आहेत?
अशी होणार निवडणूक
नायब राज्यपाल सर्वप्रथम सभागृहातील सर्वात ज्येष्ठ नगरसेवकाची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करतील. यानंतर मध्य दिल्लीचे जिल्हा न्यायाधीश एक एक करून नगरसेवकांना शपथ देतील. नगरसेवकांच्या शपथविधीनंतर महापौरांची निवड होणार आहे. महापौरपदाची सूत्रे हाती आल्यावर उपमहापौरपदाची निवडणूक होणार आहे. यानंतर स्थायी समितीच्या सहा सदस्यांचीही निवड होणार आहे.
हे मतदार मतदान करतील
दिल्ली महापालिका कायद्यानुसार महानगरपालिकेच्या सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांना महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. याशिवाय दिल्लीतील सातही लोकसभा आणि तीन राज्यसभा खासदार मतदानासाठी पात्र असतील. विधानसभेच्या १३ सदस्यांनाही मतदानाचा अधिकार आहे. म्हणजे एकूण २७३ मतदार मतदान करतील. महापालिकेत सध्या आम आदमी पक्षाचे १३४ सदस्य आहेत. राज्यसभेचे तीनही सदस्यही भाजपचेच आहेत. त्याचबरोबर लोकसभेतील सातही सदस्य भाजपचे आहेत.
महापौर कोण होणार?
दिल्ली महापालिका निकालानंतर भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता म्हणाले होते की, निकाल काहीही लागो, पण महापौर भाजपचाच होईल. मात्र, नंतर आपण विरोधी पक्षात राहून जनतेचा आवाज उठवू, असे ते म्हणाले होते. मात्र, असे असतानाही महापौर कोणत्या पक्षाचा होणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. महापालिकेत पक्षांतर विरोधी कायदा लागू नसल्याने हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
जाणकारांचे म्हणणे आहे की, ‘आम आदमी पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले असले तरी भाजपही मागे नाही. अशा परिस्थितीत आम आदमी पक्षाचे काही सदस्य भरकटले तर खेळ बिघडू शकतो. काँग्रेसचे नऊ आणि तीन अपक्ष नगरसेवक कोणत्या मार्गावर जाणार हेही पाहावे लागेल. आतापर्यंत आम आदमी पार्टी खूप मजबूत स्थितीत आहे. काँग्रेसचे काही नगरसेवकही आपसोबत जाऊ शकतात. अशा स्थितीत आम आदमी पक्ष आपला महापौर करण्यात यशस्वी होण्याची शक्यता आहे.
पहिली महिला महापौर
दिल्ली महानगरपालिका कायद्यानुसार महापालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. दरवर्षी निवडून आलेल्या नगरसेवकांमधून नवीन महापौर निवडला जातो. या कायद्यानुसार सर्वप्रथम महापौरपदी महिलेची निवड करावी लागते. त्यानंतर दुसऱ्या वर्षी कोणताही नगरसेवक महापौरपदासाठी उभा राहू शकतो. तिसऱ्या वर्षी महापौरपद एससी-एसटीसाठी राखीव आहे. यानंतर, चौथ्या आणि पाचव्या वर्षी ते पुन्हा सामान्य होते. महापालिकेचे वर्ष पहिल्या एप्रिलपासून सुरू होते. अशा परिस्थितीत ६ जानेवारीला जोही महापौर निवडला जाईल, त्याचा कार्यकाळ ३१ मार्चपर्यंतच राहणार आहे. त्यानंतर नव्या महापौरांची निवड होणार आहे.
Delhi MCD Mayor Election Politics AAP BJP