नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवी दिल्ली महापालिका (एमसीडी) निवडणुकीत तिकीट हेराफेरीचे प्रकरण समोर आले आहे. दिल्लीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने मोठी कारवाई केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आप आमदारांचे पीए विशाल पांडे आणि नातेवाईक शिव शंकर पांडे आणि ओम सिंग यांना अटक केली आहे. एका महिलेला नगरसेवकपदाचे तिकीट मिळवून देण्यासाठी ९० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप या तिघांवर आहे.
हे संपूर्ण प्रकरण कमला नगरमधील वॉर्ड क्रमांक ६९चे आहे. आपच्या कार्यकर्त्या शोभा खारी यांनी पक्षाकडे तिकीट मागितले. तिकीट मिळवून देण्याच्या बदल्यात आमदार अखिलेश पती त्रिपाठी यांनी ९० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. महिलेने तिकिटासाठी आमदार अखिलेश यांना ३५ लाख रुपये आणि वजीरपूरचे आमदार राजेश गुप्ता यांना २० लाख रुपये दिले.
यादीत नाव आल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप आहे. आम आदमी पार्टीच्या यादीत या महिलेचे नाव नाही. यावर महिलेने आमदार अखिलेश यांचे मेहुणे ओम सिंह यांच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली. ओम सिंग यांनी महिलेला पैसे परत करण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पीडित महिलेने यासंबंधीचा एक व्हिडिओही एसीबीला दिला. यानंतर पथकाने सापळा रचला आणि १५ नोव्हेंबरच्या रात्री ओमसिंग त्याचा साथीदार शिव शंकर पांडे आणि राजकुमार रघुवंशी यांच्यासह ३३ लाखांची लाच घेऊन पीडित महिलेकडे पोहोचला. येथे आधीच उपस्थित असलेल्या टीमच्या सदस्यांनी तिघांना रोख रकमेसह रंगेहात पकडले. याप्रकरणी कसून तपास सुरू आहे.
दरम्यान, याप्रकरमावरुन दिल्ली महापालिका निवडणुकीत चांगलेच राजकारण तापले आहे.
Delhi MCD Election 55 Lakh Bribe ACB 3 Arrested AAP