नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजधानी दिल्ली पुन्हा एकदा भयावह हत्याकांडाने हादरली आहे. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर प्रकरणाचीच ही पुनरावृत्ती ठरली आहे. लग्नात अडथळा ठरलेल्या प्रेयसीची लिव्ह इन पार्टनरने निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह ढाब्यावरील फ्रिजमध्ये ठेवला होता. पोलिस तपासात हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. जगभरात व्हॅलेंटाईन वीक सुरू असतानाच प्रियकराने प्रेयसीचा खून केल्याची माहिती पुढे आली आहे.
निक्की यादव (२२) असे मृत तरुणीचे नाव असून, तिचा प्रियकर साहिल गेहलोत (२६) याने ९ आणि १० फेब्रुवारीच्या मध्यरात्री तिचा गळा दाबून खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आरोपी धाबा चालवितो. त्याने निक्कीचा मृतदेह आपल्याच ढाब्यातील फ्रिजमध्ये लपवून ठेवला होता.
पोलिसांनी सांगितले की, आरोपीचे लग्न दुसऱ्याच तरुणीसोबत निश्चित झाले होते; परंतु प्रेयसी लग्नात अडथळा आणत होती. आरोपी साहिलने दुसरीकडे लग्न करावे, असे तिला वाटत नव्हते. त्यामुळे साहिलने प्रेयसीला मारण्याचा कट रचला. त्याने प्रेयसीला बोलावून तिची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर त्याने प्रेयसीचा मृतदेह ढाब्याच्या फ्रिजमध्ये टाकून पळ काढला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी पाठवला आहे आणि आरोपी साहिल गेहलोत याला अटक करण्यात आली आहे. फ्रिजमधून मृतदेह कोणत्या अवस्थेत सापडला?, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
आरोपीचा मित्रही ताब्यात
या हत्या प्रकरणात रोहित गहलोत नावाच्या तरुणाचादेखील समावेश आहे. पोलिसांनी त्याला देखील ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. रोहित हा साहिलचा मित्र आहे. मृतदेहातून दुर्गंधी पसरू नये यासाठी त्यांनी तरुणीचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला.
https://twitter.com/ANI/status/1625750304087220224?s=20&t=zA2qz7d77GI58zzUVJcfFg
Delhi Live in Partner Murder Young Girl Crime Like Shraddha Murder Case