नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीतील जहांगीरपुरी येथे हिंसाचार झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आक्रमक झाली आहे. त्यामुळे जहांगिरपुरीतील अतिक्रमणांवर बुलडोझर चालवून कारवाई करण्यास आज सकाळी प्रारंभ झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी महापालिकेच्या उत्तर विभागीय आयुक्त आणि महापौरांकडे याप्रकरणी तक्रार केली होती. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या कारवाईच्या धर्तीवर जहांगीरपुरी परिसरातील अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमाणांवर बुलडोझर चालविण्याची विनंती त्यांनी केली होती. त्याची दखल महापालिकेने घेतली आहे. त्यामुळेच जहांगिरपुरी परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणाविरोधात दिल्ली महानगरपालिकेतर्फे आज सकाळीच कारवाई सुरू झाली आहे.
महापालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जहांगीरपुरी परिसरातील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर हातोडा पाडण्याचे नियोजन महापालिकेने केले. संपूर्ण जहांगीरपुरी परिसरातील अनधिकृत भंगार दुकाने आणि इतर अनधिकृत काम करणाऱ्यांच्या ठिकाणांवर महापालिका आणि पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.
दरम्यान, जहांगीरपुरीमध्ये झालेला हिंसाचार पूर्वनियोजित होता असा संशय व्यक्त केला जात आहे. परिसरातील काही युवक आदल्या दिवशीच्या मध्यरात्री लाठ्या-काठ्या, दगड गोळा करत असल्याचे दोन सीसीटीव्ही फुटेजमधून आढळून आले आहे.
https://twitter.com/ANI/status/1516637899617234944?s=20&t=B07Q5bAyFDFKulPxt2YssA
संशयित युवक लाठ्या-काठ्या आणि दगड गोळा करत असताना काही स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध केला असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. युवक आणि स्थानिक नागरिकांमध्ये बाचाबाचीही झाली होती. या व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी पोलिस तपास करत आहेत. पोलिसांकडे हा व्हिडिओ एका स्त्रोताकडून पोहोचला आहे.
जहांगीरपुरी भागात १६ एप्रिल म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी काढण्यात आलेल्या शोभायात्रेदरम्यान झालेल्या सांप्रदायिक हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये सोनू शेख आणि अंसार शेख हे दोन आरोपी मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत आहे.