नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांना मानहानीच्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने समन्स बजावले आहे. एकनाथ शिंदे गटाचे नेते राहुल रमेश शेवाळे यांनी मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. ज्यामध्ये हे समन्स जारी करण्यात आले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनाही न्यायालयाने समन्स पाठवले आहे. न्यायालय आता या प्रकरणावर १७ एप्रिलला सुनावणी करणार आहे.
शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये एक लेख प्रसिद्ध झाला होता. शिवसेनेचे (शिंदे गट) नेते राहुल रमेश शेवाळे यांचा उल्लेख या लेखात करण्यात आला आहे. या लेखाबाबत राहुल रमेश शेवाळे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर दिवाणी मानहानीचा खटला दाखल केला होता. या लेखामुळे आपली प्रतिमा खराब झाल्याचा आरोप शेवाळे यांनी केला आहे. राहुल रमेश शेवाळे यांच्यावर जो लेख लिहिण्यात आला त्याचे शीर्षक होते, ‘राहुल शेवाळे यांचे हॉटेल, कराचीत रिअल इस्टेटचा व्यवसाय!’ आपल्या विरोधात निराधार बातम्या प्रसिद्ध करून आपली सामाजिक प्रतिमा खराब केल्याचा आरोप शेवाळे यांनी केला.
न्यायमूर्ती प्रतीक जालान यांनी उद्धव, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना हे समन्स बजावले आहे. उच्च न्यायालयाने गुगल, ट्विटर, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना ३० दिवसांत लेखी उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. प्रतिमा मलिन करणारा मजकूर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याची मागणी शेवाळे यांनी केली आहे.
शिवसेना नेते राहुल शेवाळे हे देखील बलात्कार प्रकरणात आरोपी असून दुबईत काम करणाऱ्या एका फॅशन डिझायनरने शेवाळे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. शेवाळे २०२० पासून लग्नाच्या बहाण्याने लैंगिक छळ करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी पीडितेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रारही केली आहे. शेवाळे हे मुंबई दक्षिण मध्यचे खासदार असून ते चार वेळा मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले आहेत. शेवाळे हे राज्याच्या राजकारणातील नावाजलेले नाव आहे.
https://twitter.com/LiveLawIndia/status/1640631427627892737?s=20
Delhi High Court Summons to Uddhav Aditya Thackeray Sanjay Raut