मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्नानंतर आपल्या जोडीदारासोबत लैंगिक संबंध न ठेवणे क्रुरता ठरणार असल्याचे धक्कादायक निरीक्षण हायकोर्टाने नोंदविले आहे. वैवाहिक आयुष्य जगणाऱ्या प्रत्येकाच्या रोजच्या जगण्याशी संबंध असलेल्या निरीक्षणाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
वैवाहिक जोडीदाराने हेतूपुरस्सर आपल्या साथीदाराशी लैंगिक संबंध ठेवण्यास नकार देणे ही क्रूरता असल्याचे मत दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्त केले. एका दाम्पत्याचा घटस्फोटाचा कौटुंबिक न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवताना उच्च न्यायालयाने हे मत व्यक्त केले. या दाम्पत्याचा विवाह अवघे ३५ दिवस टिकला. न्या. सुरेश कुमार कैत आणि न्या. नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने या प्रकरणी पत्नीची याचिका फेटाळली. घटस्फोट मंजूर करणाऱ्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध तिने उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. ती फेटाळताना उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेला ‘लैंगिक संबंधांशिवाय विवाह हा शाप आहे’ या निर्णयाचा संदर्भ दिला. लैंगिक संबंधांचा अभाव हे वैवाहिक जीवनासाठी अत्यंत घातक आहे असे मत न्यायालयाने नोंदवले.
हुंड्यासाठी केली होती तक्रार
घटस्फोटासाठी हायकोटारत पोहचलेल्या या प्रकरणातील महिलेने सुरुवातीला हुंड्यासाठी छळ केल्याची पोलिस तक्रार नोंदवली होती. मात्र, त्याचा कोणताही भक्कम पुरावा ती देऊ शकली नाही. या पार्श्वभूमीवर खंडपीठाने आदेशात नमूद केले की यापूर्वी एका प्रकरणात उच्च न्यायालयाने नमूद केले होते, की पती-पत्नीने विशेषत: नवविवाहित असताना लैंगिक संबंधांस जाणूनबुजून नकार देणे हे क्रूरतेचे लक्षण आहे. ते घटस्फोटासाठीचे सबळ कारण ठरू शकते.
Delhi High Court Sexual Relation Husband Wife Cruelty