नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्ली शहरात श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दरम्यान मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला होता, त्यानंतर आता पुन्हा एकदा हनुमान जयंतीच्या दिवशी दरम्यान दंगल उसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिल्लीतील जहांगीरपुरी भागातील कुशल सिनेमाजवळ शनिवारी संध्याकाळी हनुमान जन्मोत्सवाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर हल्लेखोरांनी जाळपोळही सुरू केली. यानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी दोन्ही बाजूंनी अनेक वाहनांची तोडफोड केली आणि काही वाहने आणि दुकानेही पेटवून दिली. एवढेच नाही तर तलवारी आणि काठ्याही हल्लेखोरांमध्ये वाटण्यात आल्या.
या घटनेत पोलिसांसह दोन्ही बाजूचे डझनहून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांची 10 पथके तयार करण्यात आली आहेत.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या संदर्भात दिल्ली पोलिस विभागाचे विशेष आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था ) दीपेंद्र पाठक यांनी सांगितले की, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त परिसरात लावून परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेनंतर अनेक पोलीस ठाण्यांतून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. या भागात फौजफाटा कूच करत आहे. परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. मात्र, परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. दगडफेक थांबवण्यासाठी आलेले अनेक पोलीस जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मिरवणूक कुशल सिनेमाजवळ आली तेव्हा काही नागरिकांनी मागून दगडफेक केली. यानंतर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. नागरिक इकडे तिकडे धावू लागले. यादरम्यानचे व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पोलिसांनी घटनास्थळी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे सांगण्यात आले.
परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दंगलीसह अन्य संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सुमारे अर्धा डझन जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशीही सुरू करण्यात आली आहे. पोलिस ठाण्यासह जिल्ह्यातील सुमारे अर्धा डझन पथके तपासासाठी तैनात करण्यात आली आहेत. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
दिल्ली अग्निशमन सेवेचे संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले की, या भागात जाळपोळीच्या घटना पाहता दिल्ली अग्निशमन सेवेच्या 2 गाड्याही घटनास्थळी पाठवण्यात आल्या होत्या. एका दुकानाला आणि दोन वाहनांना आग लागली, त्यावर तात्काळ नियंत्रण आणण्यात आले. कारवाई मागे घेण्यात आली असून वाहने परत मागवण्यात आली आहेत.