नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राजधानी दिल्ली येथे आज ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या निनादात लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्र सदनात गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली. महाराष्ट्र सदनासह दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांनी भक्तिमय वातावरणात गणरायाचे स्वागत केले.यंदा गणेशोत्सवाला महाराष्ट्रात राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने दिल्लीतील मराठी बांधवांमध्ये विशेष उत्साह आहे. पुढील दहा दिवस दिल्लीत भक्ती, उत्साह आणि मराठमोळ्या सांस्कृतिक जल्लोषाचे वातावरण राहणार आहे.
महाराष्ट्र सदनात गणरायाचे स्वागत
महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्यावतीने गणरायाची प्राणप्रतिष्ठा खा. डॉ श्रीकांत शिंदे यांनी केली. यावेळी निवासी आयुक्त आर. विमला, अपर निवासी आयुक्त निवा जैन, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक मनिषा पिंगळे यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी आणि गणेशभक्त उपस्थित होते. सकाळी कोपर्निकस मार्गावर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशांचा गजर आणि मंत्रोच्चारांनी गणरायाची प्राणप्रतिष्ठा थाटामाटात संपन्न झाली.
गणरायाच्या स्वागताने दिल्लीत मराठी संस्कृतीचा ठसा पुन्हा एकदा ठळकपणे उमटला आहे. हा उत्सव भक्ती आणि सांस्कृतिक वैभवाचा अनुपम संगम असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवाचा उत्साह संपूर्ण दिल्लीला सांस्कृतिक रंगात रंगवणार आहे, असे निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी सांगितले.
महाराष्ट्र सदनातील प्रदर्शन आणि बचत गटांचे विक्री स्टॉल
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात आयोजित गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्वयं सहायता गटांचे प्रदर्शन व विक्री स्टॉलला भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. मराठी संस्कृती, हस्तकला आणि परंपरांचे दर्शन घडवणाऱ्या या स्टॉल्समुळे यंदाच्या उत्सवाला विशेष रंगत आली आहे. “हा उत्सव मराठी समाजाला एकत्र आणण्यासोबतच दिल्लीतील इतर समुदायांनाही मराठी संस्कृतीची ओळख करून देतो,” असे डॉ. शिंदे यांनी नमूद केले. बचत गटांच्या या प्रदर्शन आणि विक्री स्टॉल्समुळे स्थानिक कारागिरांना आणि छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन मिळाले असून, मराठी हस्तकलेची ख्याती दिल्लीत पोहोचली आहे.
मराठी मंडळांमध्ये भक्तीचा उत्साह
दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तीपूर्ण जयघोषाने गणरायाचे स्वागत केले. यंदा गणेशोत्सवाला मिळालेल्या राज्य महोत्सवाच्या दर्जाने मराठी समाजाचा उत्साह द्विगुणित झाला आहे. दिल्लीतील मराठी बांधवांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपली सांस्कृतिक ओळख पुन्हा एकदा अभिमानाने अधोरेखित केली.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
गणेशोत्सवाच्या निमित्ताने दिल्लीत सांस्कृतिक कार्यक्रमांचा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे. विविध मराठी मंडळांनी महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारे कार्यक्रम आयोजित केले आहेत. मराठमोळ्या लावण्या, नाटक, संगीत रजनी, झांज पथकांचे सादरीकरण, कीर्तन, भजन संध्या आणि मराठी नाट्यप्रयोग यंदाच्या उत्सवात दिसणार आहेत. सर्व गणेशभक्तांचाही या उत्सवात मोठ्या प्रमाणात सहभाग आहे, ज्यामुळे दिल्लीत पुढील दहा दिवस भक्ती आणि उत्साहाचे वातावरण कायम राहील.