नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवी दिल्ली येथे नजीकच्या काळात होऊ घातलेल्या जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने, दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपम मध्ये ८ ते १० सप्टेंबर या कालावधीत ‘हस्तकला मेळावा’ (प्रदर्शन तसेच विक्री) आयोजित करण्यात आला आहे. जी-२० शिखर परिषदेच्या बैठका सुरु असताना नवी दिल्लीमध्ये भरणार असलेल्या या हस्तकला मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापुरी चप्पल तसेच पैठणी साडी या उत्पादनांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात तयार केली जाणारी कोल्हापुरी चप्पल म्हणजे अत्यंत कलात्मकतेने हाती तयार करण्यात येणारी चामड्याची पादत्राणे आहेत. स्थानिक पातळीवर विशिष्ट रंगात रंगवल्या जाणाऱ्या या पादत्राणांना वनस्पतीपासून तयार करण्यात आलेल्या रंगांच्या वापरामुळे अत्यंत अस्सल स्वरूप देण्यात येते. कोल्हापुरी चपला म्हणजे पुढील बाजूने खुल्या असणाऱ्या अत्यंत लोकप्रिय पद्धतीच्या चपला आहेत. सजावटीसाठी वापरलेले घटक आणि अत्यंत उत्कृष्ट कारागिरी यांचा आकर्षक संगम असलेल्या या चपला सुरेख आणि आरामदायी चपलांची आवड असणाऱ्यांना फार भावतात.
‘महाराष्ट्र राज्याचे महावस्त्र’ असा मान मिळवलेली पैठणी साडी अत्यंत उच्च दर्जाचे, आकर्षक रंग असलेले रेशीम धागे आणि सोन्याची जर यांच्या विणकामातून तयार होते. गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले पैठण हे मध्ययुगीन नगर पैठणीचे जन्मस्थान आहे. पैठणीचा काठ आणि पदर यांच्यावर असणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या आकृतिबंधांमुळे ही साडी इतर साड्यांपासून वेगळी ओळखता येते. या आकृतिबंधांमध्ये मुख्यतः मोर, पोपट तसेच कमळे यांचा समावेश असतो. गेल्या अनेक शतकांपासून सहावारी किंवा नऊवारी पैठणीला महाराष्ट्रातील नववधूंची पसंती मिळते आहे.
हस्तकला मेळाव्याविषयी माहिती
प्रगती मैदानावरील भारत मंडपममध्ये भरवण्यात येणाऱ्या या हस्तकला मेळाव्यात भारताच्या विविध भागांतील कलाकुसरीच्या वस्तू मांडण्यात येणार असून त्यात एक जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी), भौगोलिक मानांकन मिळवलेली उत्पादने तसेच महिला आणि स्थानिक कलाकारांनी घडवलेली उत्पादने यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जी20 शिखर परिषदेसाठी दिल्लीमध्ये आलेले प्रतिनिधी तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांचे प्रतिनिधी यांना या हस्तकला मेळाव्याला भेट देण्याची तसेच स्थानिक पातळीवर पुरवठा करण्यात आलेल्या या उत्पादनांची खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे हा मेळावा केवळ भारतातील उत्पादनांची जागतिक मंचावर जाहिरात करण्यासाठीच नव्हे तर स्थानिक कारागिरांना नव्या आर्थिक तसेच बाजारपेठविषयक संधी खुल्या करुन देण्यासाठी देखील उपयुक्त ठरणार आहे.
भारतीय कारागिरांना आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसमोर त्यांच्या कौशल्याचे आणि कलेचे सादरीकरण करता यावे यासाठी या हस्तकला मेळाव्याचा एक भाग म्हणून तज्ञ कारागीरांच्या विशेष थेट प्रात्यक्षिकांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि राज्य सरकारे तसेच केंद्रशासित प्रदेश प्रशासने यांच्या संयुक्त समन्वयाने जी-20 सचिवालयाने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. देशातील सुमारे 30 राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश आणि खादी ग्राम आणि उद्योग आयोग, ट्रायफेड, सरस आजीविका यांच्यासारख्या केंद्र सरकारी संस्था देखील या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
एक जिल्हा-एक उत्पादन ओडीओपी विषयी माहिती
देशभरातील सर्व जिल्ह्यांच्या समतोल प्रादेशिक विकासाची जोपासना करण्यासाठी पंतप्रधानांनी मांडलेल्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याच्या उद्देशाने एक जिल्हा-एक उत्पादन ओडीओपी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. देशाच्या सर्व भागांतील समग्र सामाजिक आर्थिक वाढ शक्य करण्यासाठी देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात तयार केले जाणारे एक उत्पादन (एक जिल्हा-एक उत्पादन) निवडून, त्याचे ब्रँडिंग करून आणि त्याच्या विक्रीला प्रोत्साहन देणे ही यामागची संकल्पना आहे. यासाठी उत्पादनांची निवड करताना देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील भागाचा विचार करण्यात आला असून ज्या उत्पादनांसाठी सध्या अस्तित्वात असलेले समूह तसेच समुदाय यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे त्यांच्यासह समाजाच्या विविध घटकांना स्पर्श करण्यात आला आहे. देशाच्या सर्वच्यासर्व ७६१ जिल्ह्यांसाठी नव्या भारताचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी इन्व्हेस्ट इंडिया मधील ओडीओपीचे पथक अथक कार्य करत आहे.
त्याशिवाय, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील डीपीआयआयटीच्या इन्व्हेस्ट इंडिया मंचाने महाराष्ट्र राज्य सरकारच्या उद्योग विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील ओडीओपी उपक्रमाअंतर्गत निवडण्यात आलेल्या उत्पादनांच्या श्रेणीतील उल्लेखनीय विविधतेचे प्रदर्शन करण्यासाठी ५ सप्टेंबर रोजी ‘ओडीओपी – संपर्क’ या एक दिवसीय उपक्रमाचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते. महत्त्वाच्या उद्योगविषयक कल्पनांसाठी मंच तयार करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाने आर्थिक विकास तसेच स्वावलंबन यांना चालना देण्याच्या संदर्भात ओडीओपीची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. ‘ओडीओपी-पीआयबी’ संपर्क कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सरकारच्या उद्योग विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यांचा सहभाग असलेले एक प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनामध्ये मौल्यवान रत्ने, कृषी, हस्तकला तसेच हातमाग यांच्यासह सर्व जिल्ह्यांच्या ओडीओपी उत्पादनांची विस्तृत श्रेणी सादर करण्यात आली. या प्रदर्शनाचा भाग म्हणून, यावेळी विक्रेत्यांना ओएनडीसी(एक देश, व्यापारासाठी एक डिजिटल मंच) आणि जीईएम (सरकारी ई-बाजारपेठ) यांसह केंद्र सरकारच्या इतर सर्व उपक्रमांची थोडक्यात माहिती देण्यात आली. या प्रदर्शनाने उद्योजकांना संभाव्य खरेदीदार आणि भागीदार यांच्याशी संपर्क साधण्यासाठीचा मंच उपलब्ध करून दिला.
ओडीओपी उद्योजकांच्या विकासासाठी धोरणे आणि कार्यक्रम आखण्याच्या दृष्टीने समर्पित सत्र मालिकांच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये अत्यंत मौल्यवान विचार मांडण्यात आले. इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ पॅकेजिंग, सिडबी, टपाल सेवा, सीजीटीएमएसई यांसारख्या प्रख्यात संघटना तसेच निर्यात विभाग यांच्यातर्फे या कार्यक्रमात उल्लेखनीय सादरीकरणे करण्यात आली.
Kolhapuri Chappal and Paithani Saree from Maharashtra set to feature at the Crafts Bazaar, G20 Summit in New Delhi
Delhi G20 Summit Maharashtrian Items Craft Bazaar