इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – असे म्हणतात की, प्रेम हे आंधळे असते, प्रियकर आणि प्रेयसी जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात, तेव्हा त्यांना प्रेमाशिवाय दुसरे काहीही दिसत नाही. परंतु दोघांमध्ये विशिष्ट वाद आले किंवा भांडण झाले तर मग त्याचा परिणाम देखील चांगला होत नाही. अलीकडच्या काळात अशा घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येते. दिल्लीत एका अल्पवयीन मुलीची प्रियकराने हत्या केल्याचे प्रकरण ताजेच असताना मेरठमधून आणखी धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुग्रामच्या दीपा नावाच्या तरुणीने कुटुंबाचा विरोध पत्करून साजन उर्फ गौरवशी दीड महिन्यांपूर्वी लग्न केले होते. परंतू आता या प्रेमविवाहाचा अंत झाला आहे. गौरवने दीपाचा मृतदेह गुपचूपरित्या स्मशानभूमीत नेऊन जाळला आहे.
सासरची मंडळी फरार…
या घटनेची माहिती कोणालाही नव्हती, मात्र पोलिसांना याची खबर लागल्यावर त्यांनी याचा शोध सुरू केला, तेव्हा पोलिसांना दिपाच्या सासरचे लोक घराला टाळे ठोकून फरार झाल्याचे आढळले. तीन दिवसांपूर्वी दीपाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. दीड महिन्यापूर्वी त्यांची मुलगी दीपाचा शेरगढी येथील साजन उर्फ गौरव याच्यासोबत कोर्ट मॅरेज झाले होते. दीपाच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला होता. त्यानंतर दीपा गौरवसोबत शेरगढी येथे राहू लागली होती. त्यानंतर दि. २६ मे रोजी दीपाची हत्या केल्यानंतर सासरच्यांनी तिच्यावर गुपचूप अंत्यसंस्कार केल्याची माहिती अनिताला कोणीतरी दिली. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता तेथे कोणीही आढळून आले नाही. दीपाच्या नातेवाईकांना मेरठला बोलावण्यात आले असून दीपाचा पती साजन आणि त्याच्या कुटुंबीयांचा शोध सुरू आहे.
कोर्टात लग्न..
गुरुग्राममधील एका हॉस्पिटलमध्ये दीपा कामाला होती. इन्स्टाग्रामवर साजनशी तिची ओळख झाली. साजन गुरुग्राममधील एका कंपनीत सुपरवायझर होता. यामुळे त्यांची वारंवार भेट होऊ लागली. तीन वर्षांपासून दोघेही एकमेकांसोबत राहू लागले होते. सहा महिन्यांपूर्वी दीपाने तिच्या कुटुंबीयांना साजनबद्दल माहिती दिली होती. तेव्हा दीपाला विरोध करण्यात आला होता. यामुळे दीड महिन्यापूर्वी दीपाने घर सोडले आणि साजनसोबत कोर्टात लग्न केले. मुलीच्या प्रेमविवाहानंतर तीच्या घरच्या म्हणजे माहेरच्या मंडळीनी माघार घेतली होती. दीपाशी रोज फोनवर बोलणे व्हायचे. रविवारपासून दीपाचा मोबाईल लागत नव्हता. यामुळे तिच्या आजूबाजूच्या लोकांशी संपर्क साधला तेव्हा आम्हाला ही वाईट घटना समजली, असे दिपाची आई म्हणाली. आता आमची मुलगी आम्हाला कायमची सोडून देवा घरी गेली असेही त्या म्हणाल्या.