नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चोरी करणारे चोर भावूक झाल्याचे कधी कुणी ऐकले नसेल. चोरांनी चोरलेली रक्कम घेऊन पसार होण्याऐवजी स्वत:जवळचे पैसे लुटलेल्या व्यक्तीला देण्याचाही प्रकार घडणे शक्य नाही. मात्र, दिल्लीत आश्चर्यचकीत करणारा प्रकार घडला आहे. ज्या जोडप्याला लुटले त्यांच्याकडील तुटपुंजी रक्कम पाहून चोरांनी स्वत:जवळचे शंभर रुपये त्यांना देण्याचा प्रकार घडला आहे.
देशाची राजधानी दिल्ली येथे दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशाच एका घटनेनेच सीसीटीव्ही फूटेज बाहेर आले आहे. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका जोडप्याला पिस्तुल दाखवून लुटत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खरे तर या चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या जोडप्याकडे केवळ २० रूपये सापडले. त्यानंतर चोरट्यांनी या जोडप्याला १०० रुपये देऊन तिथून पळ काढला. देव आणि हर्ष अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जून रोजी सलग तीन फोन आले. पहिल्या कॉलमध्येच एका जोडप्याचे दागिने हिसकावून घेण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दुसऱ्या कॉलवरून एका व्यक्तीकडून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली. तिसऱ्या कॉलवरून पिस्तुल दाखवून लुटण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली. पण तिन्ही कॉल वेगवेगळ्या लोकांनी केले होते. तिसरा कॉल आला त्यानंतर स्थानिक पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मग संशयिताकडे पिस्तुल असल्याचे आढळून आले. दरोडेखोरांनी एका जोडप्याकडून दागिने लुटण्याचा प्रयत्न केला असता ते दागिने बनावट असल्याचे समोर आले. यावरून चोरट्यांनी जोडप्याचा खूप अपमान केला अन् त्यांनी १०० रूपये देऊन तिथून पळ काढला. तपासाअंती चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले.
पोलिसांनी तपासले २०० फूटेज
आरोपी देव आणि हर्ष यांना अटक हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याचे पोलिसांनी सांगितले. जवळपास २०० सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना इतरही अनेक ठिकाणी लूटमार केल्याची माहिती मिळाली.