नवी दिल्ली – कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी दिल्ली सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून दिल्लीत आता पंचतारांकित हॉटेलमध्येसुद्धा कोरोनाचे उपचार केले जाणार आहेत. तसा आदेश दिल्लीच्या आरोग्य सचिवांनी खासगी रुग्णालयांना दिले आहेत. पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रतिदिन पाच हजार रुपये आणि चार तारांकित हॉटेलमध्ये प्रतिदिन चार हजार रुपये शुल्क अदा केले जाणार आहेत.
मध्य दिल्लीतील लोकनायक रुग्णालयाजवळील शहनाई आणि राऊज एव्हेन्यू हॉटेलमध्ये २४० बेडची व्यवस्था करावी. वायव्य दिल्लीतील बाबा भीमराव आंबोडकर रुग्णालयाजवळील ग्रँड उत्सव बँक्वेटमध्ये ७५ बेड आणि दीपचंद बंधू रुग्णालयाजवळील मासिक सँडोज बँक्वेट हॉलमध्ये २५० बेडची उपलब्धता करून देण्याचे आदेश दिले आहेत. या ठिकाणांवर रुग्णालयांचे आरोग्य कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. यामध्ये स्माईल डॉक्टर ही एनजीओसुद्धा मदत करणार आहे.
याशिवाय शहादरा येथील राजीव गांधी सुपर स्पेशलिटी रुग्णालयात फक्त कोरोना रुग्णांवरच उपचार सुरू आहेत. या रुग्णालयाच्या सहकार्यासाठी यमुना क्रीडा स्टेडिअममध्ये २०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. पश्चिम दिल्लीतील हरिनगर येथील डीडीयू रुग्णालयाजवळील गोल्डन ट्यूलिप बँक्वेट हॉल येथे ११० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. याप्रमाणे ८७५ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामधील ७०५ बेड आधी उपलब्ध करून दिले जातील. दिल्ली आरोग्य मिशनअंतर्गत दिल्या जाणार्या निधीचा उपयोग जिल्हा प्रशासनाने करावा. निधीची कमतरता भासल्यास दिल्ली सरकारच्या अर्थसंकल्पातून तरतूद करून दिली जाईल.
