नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या देशभरात बहुतांश राज्यांमध्ये कोरूना चा प्रादुर्भाव अत्यंत कमी झाल्यास असे दिसून येत असले तरी पुन्हा एकदा आता दिल्ली एनसीआरमधील वाढती कोरोना प्रकरणे पुन्हा एकदा चिंतेचे कारण बनली आहेत.
दिल्लीत दिवसभरात २९९ नवीन बाधित रुग्ण आढळले आहेत. यावर दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्लीतील शाळांवर लक्ष ठेऊन असल्याचे म्हटले आहे. सरकार याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल. दिल्लीतील एका शाळेत मोठ्या संख्येने कोरोना बाधित मुले आढळून आली आहेत. पण काळजी करण्यासारखे काही नाही, असे सिसोदियांनी म्हटले आहे.
हॉस्पिटलमध्ये भरती होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. हे ओमिक्रॉनसारखेच आहे, तरीही आम्ही निरीक्षण करत आहोत, असेही सिसोदिया म्हणाले. ते पुढे म्हणाले की आम्हाला काही शाळांकडून अहवाल प्राप्त झाला आहे, काही पालकांनी आम्हाला कळवले आहे की त्यांच्या मुलांना कोविड -19 ची लागण होत आहे. शाळांसाठी लवकरात लवकर मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे निर्देश त्यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत.
दिल्लीतील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होत आहेत. यासोबतच सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहेत. परीक्षेला अवघे १२ दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत शाळांमध्ये कोविड प्रोटोकॉलचे पालन केले जात आहे.
शाळांमधील संसर्गाचे वाढते प्रमाण हा आरोग्य विभागासाठी चिंतेचा विषय आहे. तसेच कालका जीचे आमदार आतिशी म्हणतात की, विद्यार्थी आणि शिक्षकांना संसर्ग होत असल्याच्या बातम्या आम्हाला मिळाल्या आहेत. त्यामुळे आम्ही परिस्थितीचे काळजीपूर्वक मूल्यांकन करत आहोत. मात्र, त्यांनी कोणत्याही शाळेचे नाव उघड केले नाही.
सध्याच्या परिस्थितीत पालक आणि शिक्षकांच्या चिंतेचा विषय त्या विद्यार्थ्यांबद्दल आहे, विशेषत: प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना, ज्यांना लस मिळाली नाही. दिल्ली एनसीआरमध्ये कोविडची प्रकरणे वाढत आहेत. आरोग्य विभागाने बुधवारी नोएडा आणि गाझियाबादमधील शाळांमधून आणखी १२ कोविड प्रकरणांची पुष्टी केली. यानंतर, एनसीआरमध्ये गेल्या ७२ तासांमध्ये, कोरोनाबाधित विद्यार्थी आणि शिक्षकांची एकूण संख्या ३५ च्या आसपास पोहोचली आहे.
सलग चार दिवसांच्या सुटी नंतर सोमवारी शाळा सुरू होणार आहेत. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता शाळांमध्ये मास्क अनिवार्य करण्यात यावे, याशिवाय सार्वजनिक वाहतूक, शाळा, महाविद्यालये आणि सिनेमागृहांमध्येही मास्क अनिवार्य करण्यात यावे, अशी मागणी दिल्ली भाजपने केली आहे.