नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय राज्यघटनेत विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ अशी रचना केली आहे. त्यापैकी न्यायमंडळ अर्थात न्यायाधीशांचे काम हे अत्यंत निरपेक्षपणे चालत असते. एखाद्या प्रकरणाची सुनावणी त्यांच्याकडे आल्यानंतरच त्यावरती भाष्य करतात. परंतु काही न्यायाधीश खूप संवेदनाशील असतात. ते स्वतःहून एखाद्या प्रकरणात लक्ष घालतात. एका न्यायाधीशाने देखील अशाच एका किरकोळ वाटणाऱ्या प्रकरणात लक्ष घातले. परंतु वास्तविक आता हे प्रकरण किरकोळ नसून गंभीर आहे, कारण मनुष्याप्रमाणेच प्राण्यांनाही जगण्याचा हक्क आहे, असे यातून दिसून येते.
म्हणून झाला कुत्र्याचा मृत्यू
कोलकाता हायकोर्टाचे न्यायमूर्ती गौरांग कंठ हे दिल्लीला राहत असताना त्यांच्या बंगल्यातील पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला. परंतु हा मृत्यू पोलिसाच्या निष्काळजीपणामुळे झाला असा त्यांचा आरोप आहे. आपत्कालिन परिस्थितीत पोलिसांनी बंगल्याचा दरवाजा उघडला नाही. या अपयशी ठरलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कंठ यांनी दिल्ली पोलिसांच्या सहआयुक्तांना (सुरक्षा) केले आहे. यासंदर्भात कंठ यांनी आयुक्तांना पत्र लिहिले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे आपल्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला असून संबंधिताविरोधात अनुशासनात्मक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. कंठ यांची दिल्ली हायकोर्टामधून कोलकाता हायकोर्टामध्ये नुकतीच बदली झाली आहे.
पत्रात हे लिहिले
न्यायमूर्ती कंठ यांनी पत्रात नमूद केले आहे की, मी हे पत्र खूप दु:खी आणि क्रोधित अंत:करणाने लिहित आहे. माझ्या बंगल्याच्या सुरक्षेमध्ये तैनात असलेल्या अधिकाऱ्यांच्या अयोग्यतेमुळे माझ्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. दरवाजा बंद ठेवण्याबाबत मी बंगल्यावर तैनात सुरक्षा रक्षकांना सातत्याने सांगत होतो. मात्र त्यांनी माझ्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. तसेच आपली व्यावसायिक जबाबदारी पार पाडण्यात ते अपयशी ठरले आहेत. कर्तव्यावरील अशा प्रकारची अपात्रता आणि दुर्लक्षावर तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे. अशा प्रकारे माझ्या जीवनालाही धोका निर्माण होऊ शकतो. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या अशा बेफिकीरीमुळे माझ्यासोबतही कुठलीही दुर्घटना होऊ शकते. मी स्वत:च्या सुरक्षेबाबत चिंतीत आहे. अशा अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करतो. खरे म्हणजे अशाप्रकारे एखाद्या न्यायाधीशाने पोलीस अधिकाऱ्यांकडे पत्र लिहून मागणी करावी याबद्दल आता सर्वत्र चर्चा सुरू आहे