नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीतील चाणक्यपुरी येथील फ्लॅटबाबत केंद्र सरकारकडून नोटीस मिळाल्यानंतर काँग्रेसने १५ एप्रिलपर्यंत फ्लॅट रिकामा करणार असल्याचे सांगितले आहे. काँग्रेस पक्षाने केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाला ही माहिती दिली आहे. १५ एप्रिलपर्यंत लुटियन्स दिल्लीतील चाणक्यपुरी येथील फ्लॅट रिकामे करेल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
सूत्रांनी सांगितले की, काँग्रेस नेते पवन कुमार बन्सल यांनी लिखित स्वरूपात म्हटले आहे की, काँग्रेस पक्ष चाणक्यपुरी फ्लॅट १५ एप्रिलपर्यंत रिकामा करेल. २५ मार्च रोजी जारी केलेल्या नोटिसमध्ये, संचालनालयाने फ्लॅटचा “अनधिकृत ताबा” असल्याचे सांगितले होते. तसेच ते लवकरात लवकर रिकामे करण्यास सांगितले होते. २०१३ मध्ये संचालनालयाने घर सोडण्यास सांगितले होते. पण निर्धारित वेळेपेक्षा चाणक्यपुरी निवासस्थानी राहिल्याबद्दल काँग्रेसवर सुमारे ३ कोटी रुपयांचे नुकसान भरपाई शुल्क आकारले जाऊ शकते. ते म्हणाले की, पक्षाला तीन दिवसांत नोटीसला उत्तर देण्यास सांगण्यात आले होते. तसेच इस्टेट संचालनालयाने पक्षाला कारणे दाखवा नोटीस बजावून चाणक्यपुरी येथे पक्षप्रमुख सोनिया गांधी यांचे सहकारी व्हिन्सेंट जॉर्ज यांच्याकडे असलेला फ्लॅट रिकामा करण्यास सांगितले होते.
१० पंडित पंत मार्गावरील बंगल्यातून भारतीय जनता पक्षाचे (भाजप) लोकसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री पी. सी. सारंगी यांच्या विरोधातही मंगळवारी बेदखलीची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. तसेच भाजपचे लोकसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री रामशंकर कथेरिया यांच्यावरही बुधवारी अशीच कारवाई करण्यात येणार असून पोलीस दलाला सुरक्षा पुरवण्याची विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. नेते चिराग पासवान यांना देखील त्यांचे दिवंगत वडील रामविलास पासवान यांच्या नावावर देण्यात आलेल्या घरातून बेदखल करण्यात आले होते. नोटीस पाठवूनही ते घर सोडत नसल्याने त्यासाठी एक पथक पाठवण्यात आले होते.