नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनी लाँड्रिग, गैरव्यवहार, भ्रष्टाचार, लाचखोरी यासंदर्भात देशभरामध्ये ठिकठिकाणी कारवाई करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) अधिकाचीर लाचखोर निघाला आहे. यासंदर्भात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने मोठी कारवाई केली आहे. हे प्रकरण तब्बल ५ कोटींच्या लाचेचे आहे. ही बाब उघड झाल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे.
दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित ५ कोटी रुपयांच्या लाचखोरीप्रकरणी ईडीचा सहाय्यक संचालक पवन खत्री याला सीबीआयने अटक केली आहे. याशिवाय अन्य सहा आरोपींविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण मद्यविक्रेते अमनदीप सिंग बल यांना आरोपींच्या यादीतून काढून टाकण्यासाठी लाच घेण्याशी संबंधित आहे.
खत्री आणि दल यांच्याशिवाय सीबीआय एफआयआरमध्ये एअर इंडियाचे सहाय्यक महाव्यवस्थापक दीपक सांगवान, क्लीराज हॉटेल्सचे सीईओ विक्रमादित्य, चार्टर्ड अकाउंटंट प्रवीण वत्स, ईडी अधिकारी नितेश कोहर आणि बिरेंदर पाल सिंग यांची नावे आहेत. ईडीच्या तक्रारीवरून सीबीआयने हा गुन्हा दाखल केला आहे.
सीबीआयने ईडीचे सहाय्यक संचालक पवन खत्री यांच्या विरोधात मद्यविक्रेते अमनदीप धल्ल याने पाच कोटी रुपयांच्या कथित पेमेंटप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. याआधी शुक्रवारी याप्रकरणी अटक करण्यात आलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना राऊस अॅव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना नवीन बँक खाते उघडून पगार काढण्याची परवानगी दिली होती.
सीबीआय आणि ईडी या दोन्ही तपास यंत्रणांनी सिसोदिया यांच्यावर दारू घोटाळ्यात आरोप केले आहेत. तपास यंत्रणांनी सिसोदिया यांची सर्व खाती जप्त केली आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी होणार आहे. सिसोदिया यांनी नुकतीच वैद्यकीय आणि इतर खर्चासाठी बँक खात्यातून काही रक्कम काढण्याची परवानगी मागितली होती.
Delhi CBI Arrest ED Director 5 Crore Bribe Corruption
Liquor Scam Case