इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दिल्लीतील आप सरकारमधील आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन हे १३ जूनपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत राहणार आहेत. जैन यांना येच्या सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात तपासाचा फटका बसलेल्या जैन यांच्या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. जैन यांच्यामुळे खुद्द ईडीचेच अधिकारी हैराण झाले आहेत. त्यामुळेच चौकशीला विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे.
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी राऊस अव्हेन्यू कोर्टात सांगितले की, “जैन खूप हळूहळू लिहितात. एक पान लिहिण्यासाठी त्यांना सुमारे दोन तास लागतात. त्यांचे विधान स्वत:च्या हस्ताक्षरात घेणे आवश्यक आहे, अन्यथा हे माझे विधान नाही, असे ते म्हणतात. जैन यांना ईडीने ३० मे रोजी अटक केली होती.
याशिवाय साक्षीदारांमध्ये पसरलेली कथित भीती हेही अधिकाऱ्यांसमोरील आव्हान आहे. अहवालानुसार, ईडीने सांगितले की, काही साक्षीदारांनी सांगितले आहे की, त्यांना सुरक्षेची भीती असल्याने त्यांना सत्येंद्र जैन यांच्यासमोर आणू नका. राजू यांनी न्यायालयाला सांगितले की, “काही साक्षीदारांनी सांगितले की, त्यांना भीती वाटते की त्यांना जैन यांच्याशी समोरासमोर आणले तर त्याचे परिणाम होतील.”
सीबीआयने 2017 मध्ये आप नेत्याविरोधात एफआयआर नोंदवला होता. त्याआधारे ईडीने त्याला ३० मे रोजी अटक केली. त्यांच्याशिवाय पत्नी पूनम जैन, अजित प्रसाद जैन, सुनील कुमार जैन, वैभव आणि अंकुश यांच्या नावाचाही एफआयआरमध्ये समावेश आहे. तपास यंत्रणेने ७ जून रोजी जैन यांच्या घरावर छापा टाकून २.८२ कोटी रुपये आणि १.८ किलो सोने जप्त केले होते.