देगलूर – देगलूर-बिलोली विधानसभा पोट निवडणुकीत महाविकास आघाडीने भारतीय जनता पक्षाला दे धक्का दिला आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांचा विजय झाला आहे. अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांचा ४१ हजार मतांनी पराभव केला आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीप्रमाणे आताही महाविकास आघाडीला धोबीपछाड देऊ असे आव्हान भाजपने दिले होते. मात्र, भाजपला येथे पराभवाची धूळ चाखावी लागली आहे.
अंतापूरकर यांना १ लाखाहून अधिक मते मिळाली. साबणे यांना ६६ हजार मते मिळाली. ही पोटनिवडणूक काँग्रेसने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात लझविली. भाजपने याठिकाणी जोरदार प्रयत्न केले. अनेक नेत्यांच्या सभा घेतल्या. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. जनतेचा मी ऋणी असून सर्वस्व झोकून जनतेसाठी कार्य करेन, असे अंतापूरकर यांनी म्हटले आहे. तर, मला पराभव मान्य असून यापुढेही झटून काम करणार असल्याचे साबणे यांनी सांगितले आहे.
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज शांतता व सुव्यवस्थेत पार पडली. मतमोजणीच्या 30 फेऱ्यानंतर निवडणुकीचा अंतिम निकाल निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी यांनी जाहीर केला. इंडियन नॅशनल काँग्रेसचे जितेश रावसाहेब अंतापूरकर हे 41 हजार 933 मताच्या फरकाने विजयी झाले.
उमेदवारनिहाय मतमोजणीत मिळालेले मते पुढीलप्रमाणे आहेत. जितेश रावसाहेब अंतापूरकर (इंडियन नॅशनल काँग्रेस 1 लाख 8 हजार 840), सुभाष पिराजीराव साबणे (भारतीय जनता पार्टी 66 हजार 907), उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी 11 हजार 348), विवेक पुंडलिकराव केरुरकर (जनता दल (सेक्युलर) 467), प्रा. परमेश्वर शिवदास वाघमारे (बहुजन भारत पार्टी 155), डी. डी. वाघमारे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे) 215), अरुण कोंडीबाराव दापकेकर (अपक्ष 143), गजभारे साहेबराव भीवा (अपक्ष 183), भगवान गोविंदराव कंधारे (अपक्ष 274), मारोती लक्ष्मण सोनकांबळे (अपक्ष 243), श्रीमती विमल बाबूराव वाघमारे (अपक्ष 496), कॉ. प्रा. सदाशिव राजाराम भुयारे (अपक्ष 486), नोटा (वरीलपैकी कोणीही) नाही (1 हजार 103), रद्द झालेले मतदान 30 आहे, असे एकुण 1 लाख 90 हजार 890 एवढे मतदान झाले आहे. या देगलूर पोटनिवडणुकीसाठी एकुण 150 अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले होते.
देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
मतदारांचे मन:पूर्वक आभार. pic.twitter.com/Lr1pzvU015— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 2, 2021