नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अग्निपथ योजनेच्या विरोधात देशव्यापी विरोध आणि गदारोळ सुरू असताना संरक्षण मंत्रालयाच्यावतीने आज एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेण्यात आली. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम हे स्पष्ट केले की अग्निपथ ही योजना कुठल्याही परिस्थितीत मागे घेतली जाणार नाही. अग्निवीरच्या माध्यमातून भारतीय लष्कर कसं उत्कटता आणि संवेदना यांचा समतोल साधण्याची योजना आखत आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं.
पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले लेफ्टनंट जनरल पुरी म्हणाले की, आता लष्करातील सर्व भरती अग्निवीर अंतर्गतच होणार आहे. यापूर्वी अर्ज केलेल्यांची वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. प्रत्येकाला नव्याने अर्ज करावा लागेल. यासोबतच पर्यायी भरतीची कोणतीही योजना नसल्याचेही स्पष्ट केले. सध्या योजनेच्या सुरुवातीला 46 हजार अग्निवीरांची भरती केली जात आहे. ही क्षमता आणखी वाढेल. पुढील 4-5 वर्षांत ही संख्या 50 हजार ते 60 हजार होईल. नंतर ती 90 हजारांवरून एक लाखांपर्यंत वाढवली जाईल. लष्कराच्या योजनेअंतर्गत सव्वा लाख अग्निवीरांची भरती केली जाईल. अशा प्रकारे 25% कायमस्वरूपी ठेवल्यास आपोआप 46 हजार अग्निवीर कायमस्वरूपी दाखल होतील. त्याचबरोबर देशसेवेदरम्यान एखादा अग्निवीर शहीद झाल्यास त्याला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
व्हाईस अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी सांगितले की, आम्ही अग्निवीर योजनेअंतर्गत नौदलात महिलांचीही भरती करू. त्यांना युद्ध नौकांवरही तैनात केले जाईल. यावर्षी 21 नोव्हेंबरपासून प्रथम नौदल अग्निवीर प्रशिक्षण केंद्रांवर पोहोचण्यास सुरुवात करेल. यामध्ये महिला व पुरूष उमेदवारांचा समावेश करण्यात येणार आहे. सध्या भारतीय नौदलात ३० महिला अधिकारी आहेत ज्या वेगवेगळ्या जहाजांवर खलाशी म्हणून तैनात आहेत, असे त्यांनी सांगितले.
defence officer press conference agnipath scheme agniveer recruitment army navy air force