इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारताचे एक क्षेपणास्त्र ९ मार्चला पाकिस्तानातील पंजाबच्या मियाँ चन्नू शहराजवळ पडल्यामुळे पाकिस्तानात एकच खळबळ उडाली होती. यावर भारतीय संरक्षण मंत्रालयाने खुलासा केला होता. पाकिस्तानमध्ये भारतीय क्षेपणास्त्र कोसळल्याची घटना हा तांत्रिक चुकीमुळे घडलेला अपघात होता. याबद्दल खेद व्यक्त करून संरक्षण मंत्रालयाने या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेवरून पाकिस्तानने भारतावर गंभीर आरोप करत भारतीय वकिलातीच्या अधिकाऱ्यांना बोलावून जाबही विचारला होता. याप्रकरणी आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज संसदेत निवेदन केले.
संरक्षण मंत्रालयाने निवेदन जारी केलेल्या निवेदनानुसार, ९ मार्चला नियमित तपासणीदरम्यान तांत्रिक चूक झाल्याने हे क्षेपणास्त्र डागले गेले. सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानात जाऊन कोसळल्याचे कळते. हे अतिशय खेदजनक आहे. मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारची प्राणहानी झाली नाही ही दिलासादायक बाब आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती ठाऊक असलेल्या तज्ज्ञांचे मते सरकारकडून या प्रकरणी सर्व पैलूंची चौकशी करण्यात येणार आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी संसदेत दिली ही माहिती (व्हिडिओ)
My Statement in Rajya Sabha. pic.twitter.com/zKHypKgNLX
— Rajnath Singh (मोदी का परिवार) (@rajnathsingh) March 15, 2022
या घटनेमुळे पाकिस्तानकडून शुक्रवारी इस्लामाबादमध्ये भारतीय राजदूताला पाचारण करण्यात करून आपल्या क्षेत्रात क्षेपणास्त्र पडल्याबाबत आक्षेप नोंदवला होता. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, ९ मार्चला सायंकाळी ६ वाजून ४३ मिनिटांनी अचानक हे क्षेपणास्त्र डागले गेले होते. ६ वाजून ५० मिनिटाला ते पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मियां चन्नू शहराजवळ एका मैदानात जाऊन कोसळले होते.
पाकिस्तानच्या दाव्यानुसार, एका निशस्त्र ध्वनीच्या वेगाच्या क्षेपणास्त्राने भारतातील सिरसा येथून उड्डाण केले आणि बुधवारी सायंकाळी पाकिस्तानमधील १२४ किमीच्या अंतरावर जाऊन कोसळळे. हे क्षेपणास्त्र ४० हजार फुटांच्या उंचीवरून उड्डाण करत होते. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही हवाई क्षेत्रामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवांना या क्षेपणास्त्रामुळे धोका उद्भवला असता, असे पाकिस्तानने म्हटले आहे.