नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -सिंगापूरचे संरक्षण मंत्री डॉ एनजी इंग हेन यांनी मंगळवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
राष्ट्रपती भवनात डॉ. हेन यांचे स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, भारत आणि सिंगापूरचा द्विपक्षीय सहकार्याचा समृद्ध इतिहास असून पंतप्रधान मोदी यांच्या अलिकडील सिंगापूर भेटीमुळे आणि भारत-सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज परिषदेच्या दुसऱ्या फेरीच्या समारोपामुळे आणखी चालना मिळाली आहे. हे संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीमध्ये रूपांतरित झाले आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
पहिल्या आसियान -भारत सागरी सरावाचे यशस्वीपणे सह-आयोजन केल्याबद्दल राष्ट्रपतींनी सिंगापूरचे अभिनंदन केले आणि संयुक्त सरावांच्या आगामी मालिकेसाठी दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांना शुभेच्छा दिल्या.
संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक कौशल्य आणि तांत्रिक प्रगतीचा लाभ घेण्यासाठी दोन्ही देशांच्या संरक्षण संशोधन आणि विकास दलांमध्ये घनिष्ठ सहकार्याची गरजही राष्ट्रपतींनी अधोरेखित केली.