नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- 2024-25 या आर्थिक वर्षात संरक्षण निर्यात 23,622 कोटी रुपयांच्या (सुमारे 2.76 अब्ज अमेरिकन डॉलर्स) विक्रमी उच्चांकावर पोहोचली आहे. 2023-24 मधील संरक्षण निर्यातीच्या आकडेवारीच्या तुलनेत नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात, 2,539 कोटी रुपयांची म्हणजेच 12.04% वाढ नोंदवण्यात आली. 2023-24 मधील संरक्षण निर्यात 21,083 कोटी रुपये होती.
संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या निर्यातीत आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये निर्यातीत 42.85 % ची लक्षणीय वाढ दिसून आली. यातून जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची वाढती स्वीकारार्हता आणि जागतिक पुरवठा साखळीचा भाग होण्यासाठी भारतीय संरक्षण उद्योगाची क्षमता प्रतिबिंबित होते. 2024-25 च्या संरक्षण निर्यातीत खाजगी क्षेत्र आणि संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी अनुक्रमे 15,233 कोटी रुपये आणि 8,389 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे, तर आर्थिक वर्ष 2023-24 साठी संबंधित आकडेवारी अनुक्रमे 15,209 कोटी रुपये आणि 5,874 कोटी रुपये इतकी होती.
X या समाज माध्यमावरील एका संदेशाद्वारे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशप्राप्तीसाठी सर्व भागधारकांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2029 पर्यंत संरक्षण निर्यात 50,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने भारत वाटचाल करत आहे, असे संरक्षण मंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
भारत एकेकाळी मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून होता मात्र आता स्वावलंबी आणि स्वदेशी उत्पादनावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करणारे सैन्यदल बनला आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात सुमारे 80 देशांमध्ये दारूगोळा, शस्त्रे, उप-प्रणाली/प्रणाली आणि सुटे भाग अशा विस्तृत श्रेणीतील वस्तूंची निर्यात करण्यात आल्याने संरक्षण निर्यातीला मोठी चालना मिळाली आहे.