नवी दिल्ली – सीडीएस जनरल बिपिन रावत यांना घेऊन जाणाऱ्या Mi-17V-5 हेलिकॉप्टरच्या अपघाताने देशातील संरक्षण पदावर असलेले एक सर्वोच्च अधिकारी काळाने हिरावून नेले आहेत. त्यांच्या अपघाती आणि अकाली निधनाने संपूर्ण संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. किंबहुना केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांनी दुःख व्यक्त केले आहे. या अपघातामुळे सशस्त्र दलांच्या विमानांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. लष्कराच्या तिन्ही दलाची विमाने सातत्याने अपघाताला बळी पडत आहेत. गेल्या दहा वर्षांची आकडेवारी पाहिली तर दरवर्षी सरासरी 20 लष्करी विमाने कोसळत आहेत. या अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात लष्करी अधिकारी काळाच्या पडद्याआड गेले आहेत.
आजवरचा सर्वात भीषण अपघात
जुन्या अपघातांबद्दल सांगायचे तर दि. 22 नोव्हेंबर 1963 रोजी पुंछमध्ये झालेला हेलिकॉप्टर अपघात हा आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि भीषण अपघात होता. यात लेफ्टनंट जनरल दौलत सिंग, लेफ्टनंट जनरल बिक्रम सिंग, मेजर जनरल एनडी नानावटी, ब्रिगेडियर राम ओबेरॉय, वेस्टर्न एअर कमांडचे प्रमुख एअर व्हाइस मार्शल ईडब्ल्यू पिंटो आणि फ्लाइट लेफ्टनंट एसएस सोढी यांच्यासह सहा वरिष्ठ लष्करी अधिकारी मारले गेले. काल, बुधवारची दुर्घटना ही पुंछ दुर्घटनेची जणू पुनरावृत्ती असल्याचे दिसून येत आहे.
दोन मोठे लष्करी अधिकारी गमावले
या पुर्वी सन 1942 मध्ये एका अपघातात लेफ्टनंट जनरल एसएम नागेश आणि मेजर जनरल केएस तिमैया यांना आपला जीव गमवावा लागला होता.
दहा वर्षात 6 मोठे अपघात
एमआय- 17 हे अत्यंत सुरक्षित मानले जात असले तरी गेल्या दहा वर्षांत या वर्गातील अनेक हेलिकॉप्टर अपघाताचे बळी ठरले आहेत. मात्र, प्रत्येक अपघातामागे वेगवेगळी कारणे समोर आली आहेत. एप्रिल 2018 मध्ये केदारनाथमध्ये एमआय-17 हेलिकॉप्टर, ऑक्टोबर 2017 मध्ये अरुणाचल प्रदेश, जून 2013 मध्ये उत्तराखंड, नोव्हेंबर 2010 आणि एप्रिल 2011 मध्ये तवांग आणि ऑगस्ट 2012 मध्ये जामनगरमध्ये अपघात झाला. या अपघातांमध्ये सुमारे 50 लष्करी जवानांचा मृत्यू झाला.
अवलंबित्व
लष्करातील सुमारे 50 वर्षे जुन्या तंत्रज्ञानावर तयार करण्यात आलेली चित्ता आणि चेतक हेलिकॉप्टर व विमान अपघातांच्या बाबतीत सर्वात असुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. त्यांना लष्करातून हटवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. मात्र, नवीन हेलिकॉप्टर घेण्यास विलंब झाल्याने चित्ता आणि चेतक यांच्यावरील अवलंबित्व सुटत नाही.
देखभाल व प्रशिक्षणाचा अभाव
चेतक आणि चित्ताची निकृष्ट देखभाल, वैमानिकांच्या प्रशिक्षणाचा अभाव आणि जुन्या तंत्रज्ञानासह योग्य सुटे भाग नसल्यामुळे ही हेलिकॉप्टर अपघाताचे बळी ठरत असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. गेल्या वीस वर्षांत तिन्ही सेवांमध्ये 50 हून अधिक चेतक किंवा चीता हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहेत. यामध्ये किमान 60 लष्करी जवान शहीद झाले आहेत.
400 नवीन हेलिकॉप्टरची गरज
चेतक आणि चित्ता काढून टाकल्यास सुमारे 400 नवीन हेलिकॉप्टरची गरज भासेल. मात्र, HAL ची 126 हलकी हेलिकॉप्टर बनवण्याची योजना लांबणीवर पडली आहे. पुढील वर्षापासून HAL कडून पुरवठा करणे शक्य आहे, परंतु गरज एकट्या HAL कडून शक्य नाही. त्याचप्रमाणे रशियाकडून 200 कामोव्ह-226टी हेलिकॉप्टरचा करारही लांबणीवर पडत आहे. एवढेच नाही तर नवीन हवाई वाहने अधिग्रहणासाठी सरकारला 40 हजार कोटी रुपयांची गरज भासणार आहे.