मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव ता. खंडाळा जि. सातारा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय संरक्षण अकादमी स्थापन करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने २४ कोटी रुपयांचा मंजूर करण्यात आला आहे. ही अकादमी सूरू करण्यासाठी पर्यटन विभागाच्या जागेचे हस्तांतर करण्याबाबत एमटीडीसीसोबत पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन लवकरच ही अकादमी सुरू करण्यात येईल अशी माहिती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर राज्याचे इतर मागासवर्ग बहुजन विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी दिली.
छगन भुजबळ यांनी आज नायगाव ता. खंडाळा जि. सातारा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय संरक्षण अकादमी स्थापन करण्याच्या निर्णयाबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यात ते म्हणाले की, महाज्योतीच्या वतीने सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव ता. खंडाळा जि. सातारा येथे २०० मुलींसाठी निवासी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (नॅशनल डिफेन्स अकॅडमी) व अन्य स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी निवासी संकुल उभारणे या कामाला दि.०७.०३.२०२२ च्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग तसेच इतर वंचित व दुर्लक्षित घटकातील मुलींसाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व इतर स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणासाठी या निवासी प्रशिक्षण संकुलाच वापर होणार आहे. या ठिकाणी २०० मुलींच्या निवासाची व्यवस्था, डीजीटल क्लास रूम, वाचनालय व अभ्यासिका, प्रशिक्षणासाठी मैदान, सुसज्ज व्यायामशाळा इ. व्यवस्था या संकुलामध्ये निर्माण केली जाणार आहे. या ठिकाणी पर्यटन विभागाचे विनावापर असलेल्या संकुलामध्ये तात्पुरत्या स्वरुपात हे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. पर्यटन विभागाच्या अंतर्गत असलेल्या MTDC च्या मालकीचे हे संकुल आहे. ते वापरात नसल्यामुळे मागील ५ वर्षांपासून बंद पडले असल्याचे सांगत याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
ते म्हणाले की,पर्यटन विभागाकडून महाज्योतीने हे पर्यटन संकुल हस्तांतरित करून घ्यावे. महाज्योतीच्या वतीने या पर्यटन संकुलाची पूर्ण देखभाल दुरुस्ती करून त्याचा उपयोग प्रशिक्षण केंद्रासाठी केला जाणार आहे. हे संकुल हस्तांतरित करून घेण्यासाठी महाज्योतीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे. हे संकुल ताब्यात घेवून त्याची डागडूजी करून लवकरात लवकर तात्पुरत्या स्वरुपात हे प्रशिक्षण केंद्र सुरु केले जावे. ही झाली तात्पुरती व्यवस्था याठिकाणी करण्यात यावी. त्यांनतर कायमस्वरूपी व्यवस्थेसाठी सदर निवासी स्पर्धा प्रशिक्षण संकुलाच्या बांधकामासाठी जमीन खरेदी करण्याकरिता शासन निर्णय दि. ७ मार्च २०२२ अन्वये ६ कोटी रुपयांचा निधी मंजुर आहे. ही जागा खरेदी करण्यासाठी महाज्योतीने काय कार्यवाही केली.
जागा ताब्यात घेवून कार्यान्वयीन यंत्रणेकडे कधी देणार, शासन निर्णयामध्ये कार्यान्वयीन यंत्रणा कोण आहे त्याचा उल्लेख नाही. या कामाची कार्यान्वयीन यंत्रणा कोण आहे,कार्यान्वयीन यंत्रणेकडून इमारत बांधकामाची निविदा प्रक्रिया कधी राबविली जाणार, एमटीडीसी कडून पर्यटन संकुल ताब्यात घेवून त्याची तात्पुरती डागडूजी करून हे निवासी स्पर्धा प्रशिक्षण संकुल कधी पासून सुरु केले जाणार असे सवाल त्यांनी तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केले.
यावर उत्तरात राज्याचे इतर मागासवर्ग विभागाचे मंत्री अतुल सावे म्हणाले की,सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी, सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे प्रस्तावित असलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय संरक्षण अकॅडमीसाठी २४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याबाबत ६ जानेवारी २०२३ ला पर्यटन विभागाला पत्र देण्यात आले असून या जागेचे हस्तांतरण करण्यासाठी एमटीडीसीकडे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत निर्णय घेऊन लवकरच संस्थेच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. प्रथमतः या जागेवर जाण्यासाठी रस्त्याचा प्रश्न आहे तो तातडीने मार्गी लावण्यात येत असून लवकरच कामाला सुरुवात होईल अशी माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली.
Defence Academy for Girls Assembly Session