नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या पाच वर्षात ऑनलाइन व्यवहारांना मोठी चालना मिळाली आहे. परंतु या व्यवहारात अनेक धोकेही आहेत. कोरोना संसर्गापासून बचावासाठीही ऑनलाई व्यवहारांवर भर दिला जात आहे. मात्र, याच महामारीमुळे गुन्हेगारीही वाढली आहे. खासकरुन सायबर क्राईममध्ये मोठी वाढ झाली आहे. जीमेलच्या माध्यमातून क्रेडिट आणि डेबिट कार्ड पासवर्ड हॅक करून फसवणूक करून कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या दोन बनावट कॉल सेंटरचा सायबर पोलिस स्टेशनने पर्दाफाश केला आहे.
याप्रकरणी पतीसह कॉल सेंटर चालवणाऱ्या महिला व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. रजनी रावत (२८, रा. नजफगढ) असे त्यांचे नाव आहे. याशिवाय १५ मुली आणि एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप, आरिफ आणि प्रेमलता फरार आहेत. आरोपींकडून सुमारे सव्वा लाख रुपये रोख, ३२ मोबाईल फोन, एक लॅपटॉप, १२ डेबिट आणि क्रेडिट कार्ड आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. सदर आरोपी गेल्या दोन वर्षांपासून हा व्यवसाय करत असल्याचे तपासात समोर आले आहे. कबीर नगरमध्ये राहणाऱ्या रिहान खानने १२ जानेवारीला फसवणुकीची तक्रार दिली होती. त्याच्याकडे दोन क्रेडिट कार्ड असल्याचे त्याने सांगितले. कोणतीही खरेदी केली नाही, परंतु कोणीतरी त्याच्या कार्डमधून सुमारे २ लाख रुपये काढून घेतले.
ज्या खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित केले गेले त्या खात्यांची माहिती गोळा करत असताना पोलिसांना एक जीमेल पत्ता आला. यानंतर पोलिसांना एका आयपी अॅड्रेसची गुप्त माहिती मिळाली. त्याच्याशी जोडलेल्या फोन नंबरच्या आधारे पोलिसांनी उत्तम नगर येथील कॉल सेंटर गाठले. तेथे छापा टाकला असता हा नंबर तनजीम नावाचा तरुण चालवत असल्याची माहिती मिळाली. सदर कॉल सेंटर हे आरिफ आणि त्याची पत्नी रजनी रावत आणि परवेझ आणि त्यांच्या महिला सहकारी चालवत होते. दुसरे कॉल सेंटर संदीप आणि प्रेमलता चालवत होते. येथून १४ मुलींना ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे हे भामटे कॉल सेंटरमध्ये कमी व्याजाने कर्ज मिळवून देण्याचे सांगून नागरिकांकडून पैसे उकळायचे. दुसरीकडे ट्रूकॉलरच्या माध्यमातून लोकांचा जीमेल आयडी ओळखला जात होता. त्यानंतर त्याचा जीमेल पासवर्ड क्रॅक करून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डही सापडले. आता या प्रकरणातील फरार उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.