नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात अत्यंत महत्त्वाचा खुलासा मंगळवारी झाला आहे. दुसऱ्या लाटेने देशातील अनेक राज्यांमध्ये हाहाकार माजवला. कुणाला बेड मिळाले नाही तर कुणाला ऑक्सिजन तर कुणाला इंजेक्शन. असे असले तरी देशात ऑक्सिजनअभावी एकाही मृत्यूची नोंद झाली नसल्याची धक्कादायक माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी राज्यसभेत दिली आहे. पहिल्या लाेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली. पहिल्या लाटेत भारतामध्ये ३०९५ मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी होती. तर, दुसऱ्या लाटेत हीच मागणी ९ हजार मेट्रिक टन एवढी झाली. आरोग्य हा राज्य सरकारांचा विषय असून कोरोना मृत्यूंबाबत राज्य सरकारांकडून माहिती दिली जाते. राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश यांनी ऑक्सिजन कमतरतेअभावी मृत्यू झाल्याची कुठलीही नोंद झाली नसल्याचे आरोग्य विभागाच्या निवेदनात म्हटले आहे. ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांना सर्वतोपरी मदत केली व तातडीने पाऊले उचलली, असे डॉ. पवार यांनी स्पष्ट केले आहे.