नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गारठा वाढल्याने खोकल्याने त्रस्त असलेल्या ९० वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. रामप्रसाद तोताराम उज्जैन (वय ९० रा. सुखदेव नगर, पाथर्डी फाटा) असे मृत वृध्दाचे नाव आहे. त्यांच्यावर बिटको रूग्णालयात उपचार सुरू होते. उज्जैन हे लहवितमध्ये वास्तव्यास असून, नातीकडे ते विश्रांतीसाठी पाथर्डी फाटा भागात आले होते.
गेल्या दोन महिन्यांपासून ते खोकल्याने त्रस्त होते. सध्या वाढत्या थंडीमुळे नाशिकचा पारा ९.२ अंश सेल्सियसपर्यंत घसरला आहे. लांबलेला पाऊस आणि अतिवृष्टीमुळे यंदा थंडीची लाट तीव्र असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या बदलत्या वातावरणाचा गंभीर परिणाम आरोग्यावर होत असून, खोकला झालेल्या वृद्धाला देखील थंडीमुळे अधिक त्रास झाल्याचे कळते. कुटुंबियांनी त्यांना तातडीने नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. थंडी आणि खोकल्यामुळेच वृध्दाचा मृत्यू झाल्याची नोंद वैद्यकीय सुत्रांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत इंदिरानगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.