मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोदी सरकारने नवरात्रीमध्ये करोडो केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए वाढ) ३४ टक्क्यांवरून ४ टक्क्यांनी वाढवत थेट ३८ टक्क्यांवर नेला आहे. या निर्णयानंतर ५० लाखांहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि ६२ लाख पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे. हा वाढीव महागाई भत्ता १ जुलै २०२२ पासून लागू होणार आहे.
डीए वाढण्याची ही दुसरी वेळ आहे. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी मध्ये महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. सरकारकडून वर्षातून दोनदा डीएमध्ये वाढ जाहीर केली जाते. जानेवारीत ३ तर आता सप्टेंबरमध्ये ४ टक्के वाढ झाली आहे. म्हणजेच, या वर्षात एकूण ८ टक्के डीए वाढ झाली आहे.
पगार एवढा वाढणार
यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता मिळत होता. आता ४ टक्के डीए वाढल्यानंतर तो ३८ टक्के झाला आहे. म्हणजेच, जर एखाद्या कर्मचाऱ्याचे किमान मूळ वेतन (बेसिक) १८ हजार रुपये असेल, तर त्याचा एकूण डीए ६ हजार ८४० रुपये असेल. म्हणजेच आता दरमहा ७२० रुपयांचा फायदा मिळणार आहे. त्याचवेळी, जर एखाद्याचे कमाल मूळ वेतन ५६,९०० रुपये असेल तर ३४% च्या दराने, सध्याचा महागाई भत्ता १९,३४६ रुपये होता. आणि तो ३८ टक्के डीएच्या आधारे वाढून २१,६२२ रुपये झाला आहे. म्हणजेच आता मासिक पगार २१,६२२-१९,३४६ रुपये = २२६० रुपये एवढा वाढीव लाभ मिळेल. वार्षिक आधारावर पाहिले तर ते २२६०X१२ = रु. २७,१२० होते. गेल्या जुलै महिन्यापासून आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. तो फरकही मोठा असेल आणि आता तो सणासुदीत मिळेल.
निवृत्तीवेतन धारकांना लाभ
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे पडणारा अतिरिक्त आर्थिक भार वर्षाला अंदाजे ६,५९१.३६ कोटी रुपये तर आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये (म्हणजेच, जुलै, २०२२ ते फेब्रुवारी, २०२३ या ८ महिन्यांच्या काळासाठी) ४,३९४.२४ कोटी रुपये इतका असेल. निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई सवलतीत वाढ झाल्यामुळे पडणारा अतिरिक्त आर्थिक भार वर्षाला अंदाजे ६,२६१.२० कोटी रुपये; आणि आर्थिक वर्ष २०२२-२३ (म्हणजेच जुलै, २०२२ ते फेब्रुवारी, २०२३ या ८ महिन्यांच्या काळासाठी) ४,१७४.१२ कोटी रुपये इतका असेल. महागाई भत्ता आणि महागाई सवलतीमुळे सरकारी तिजोरीवर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार वर्षाला अंदाजे १२,८५२.५६ कोटी रुपये, तर आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये (म्हणजेच जुलै, २०२२ ते फेब्रुवारी, २०२३ या ८ महिन्यांच्या काळासाठी) ८,५६८.३६ रुपये इतका असेल.
Dearness Allowance Hike Central Government Employee
Salary