नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-संरक्षण मंत्रालयाने रशियन महासंघाच्या रोसोबोरोन एक्सपोर्ट (आरओई) सोबत 248 दशलक्ष डॉलर्स किमतीचा करार केला आहे. या कराराअंतर्गत टी-72 रणगाड्यासाठी 1000 एचपी इंजिन संपूर्णतः तयार स्थितीत आणि जोडणी केलेल्या अर्ध-तयार अवस्थेत असतील.
या कराराचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे संरक्षण क्षेत्रातील ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी या करारात तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या अंतर्गत रोसोबोरोन एक्सपोर्टकडून चेन्नईच्या अवाडी येथील शस्त्रास्त्र वाहन निगम लिमिटेड (अवजड वाहन कारखाना) ला इंजिन जोडणी आणि नंतर परवानाधारक उत्पादनासाठी तंत्रज्ञान हस्तांतरणाचा समावेश आहे.
टी-72 रणगाडा हा भारतीय लष्कराच्या मुख्य रणगाडा ताफ्याचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सध्या हे रणगाडे 780 एचपी इंजिनने सुसज्ज आहेत. मात्र 1000 एचपी इंजिनने त्यांना अधिक शक्तिशाली बनवता येईल, ज्यामुळे भारतीय लष्कराची रणभूमीवरील गतिशीलता आणि आक्रमक क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल.