नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मासिक पाळी या विषयावर संकोचाने बोलले जाते. त्यावर चर्चा होत नाही. त्याबाबत बर्याच अंधश्रद्धा व गैरसमजुती आहे.एखाद्या घरातील लेकीला मासिक पाळी सुरू होणे म्हणजे पारंपरिक समजुती व पुर्वग्रहामुळे तिच्या मनात अपराधी पणाचा भाव निर्माण होतो. पण या सर्वाना छेद देण्याचे काम नाशिकच्या चांदगुडे दांपत्यांनी केले आहे. आपल्या लेकीचा सन्मान व्हावा, तिच्यात अपराधीपणाची भावना निर्माण होऊ नये, समाजाचा मासिक पाळीबाबतचा दृष्टिकोन बदलला पाहिजे यासाठी चांदगुडे दांपत्यांनी मासिक पाळी महोत्सवाचे आयोजन केले. या क्रांतिकारी उपक्रमाची समाजमाध्यमातुन राज्यभर चर्चा होत आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्त कृष्णा व अॅड विद्या चांदगुडे यांची तेरा वर्षेची मुलगी यशदा हिला परवा प्रथमच मासिक पाळी आली. त्यानिमित्ताने महामार्गावरील एका हाॅटेलमध्ये तिच्या प्रथम मासिक पाळीचे आयोजन करण्यात आले होते. ‘आता माझी पाळी, मीच देते टाळी’ हे घोषवाक्य घेऊन उपक्रम राबवला गेला. मासिक पाळी या विषयावर समाजबंध संस्थेचे कल्पेश जाधव यांनी व्याखानातून जनजागरण केले. या विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक व्हावा यासाठी या महोत्सवात कोष हा लघुपट दाखवला गेला.
मासिक पाळी या विषयावर संदेश देणारी गाणी व कविता यावेळी म्हटल्या गेली. संत वाड्मयातील रचनांमध्ये सापडणाऱ्या अभंगांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. महिला व पुरुषांचा मासिक पाळी या विषयावर चर्चासत्र झाले. यात डाॅ. टी.आर. गोराणे, महेंद्र दातरंगे, कोमल वर्दे, जयश्री पाटील, अॅड विद्या चांदगुडे, प्रथमेश वर्दे आदींनी सहभाग नोंदवला. यावेळी मासिक पाळी या विषयावर असलेली प-पाळीचा ही पुस्तिका वितरीत केल्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला.
उपस्थितांनी मनातील अंधश्रद्धा दुर झाल्याची भावना व्यक्त केली. दिडशे निमंत्रीत स्नेहजण यावेळेस उपस्थिती होते. सूत्रसंचालन किरण चांदगुडे यांनी केले. तर आभार यांनी अॅड समीर शिंदे यांनी मानले.स्नेहजनांनी आणलेल्या सॅनेटरी पॅडचे वस्तीतील गरजू मुलींना वाटप करण्यात आले.
“समाजात मासिक पाळी संदर्भात खुपच गैरसमजाती,अंधश्रद्धा आहेत. अंनिस मध्ये काम करतांना त्याबाबत आम्ही प्रबोधन करत असतो.आज आमच्या मुलीला प्रथमच मासिक पाळी आल्यानंतर प्रबोधनासोबत प्रत्यक्ष कृतीची जोड देण्याची गरज होती. म्हणून प्रथम मासिक पाळी महोत्सवाचे नियोजन आम्ही केले. त्यातून उपस्थितांना सकारात्मक दृष्टीकोन मिळाला”
– कृष्णा चांदगुडे, यशदाचे वडील
Daughter Menstrual Cycle Festival Celebrate by Chandgude Family