इंडिया दर्पण विशेष लेखमाला
श्रीदत्त परिक्रमा
लेख १३वा श्रीदत्त क्षेत्र महिमा १९ वे
स्वामी समर्थांची लिलाभूमी
|| श्री क्षेत्र अक्कलकोट ||
दत्त संप्रदायात श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. सोलापूरहून स्वामी जे अक्कलकोटला आले ते शेवट पर्यंत तेथेच राहिले. अक्कलकोटची भूमी ही स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे. श्रीदत्त परिक्रमेच्या आजच्या भागात आपण स्वामी समर्थांची लिलाभूमी असलेल्या श्री क्षेत्र अक्कलकोट येथे जाणार आहोत.
अक्कलकोटची भूमी ही स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे. सोलापूरहून स्वामी जे अक्कलकोटला आले ते शेवट पर्यंत तेथेच राहिले. अक्कलकोट हे मुख्यतः तालुक्याचे ठिकाण असून ते सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे. समर्थ भक्त हे ठिकाण पवित्र आणि प्रासादिक मानतात. हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे स्वामी आज हि येथे आहेत अशी भक्तांची पूर्ण श्रद्धा आहे.
श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीनृसिंहसरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये साडेतीनशे वर्षे गेली. त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. एके दिवशी एक लाकूडतोडय़ा लाकडे तोडताना कुऱ्हाडीचा घाव वारुळावर बसला व तो श्रीस्वामी समर्थांचे मांडीवर लागून श्रीस्वामी समर्थ समाधीतून जागे झाले. तो कुऱ्हाडीचा वार त्यांचे मांडीवर स्पष्ट दिसत असे.
मंगळवेढे येथील वास्तव्यानंतर श्रीस्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ, सोलापूर ह्या ठिकाणी वास्तव्य करून अक्कलकोट येथे आले त्या वेळी तीन दिवस स्वामींनी अन्नग्रहण केले नव्हते. चोळाप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले. त्या वेळेपासून श्री चोळाप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले. चोळाप्पांचे घरातील मंडळी त्यांना ‘एक वेडा घरात आणून ठेवला आहे’ असे म्हणत. श्री स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोट येथील मंडळीस येऊ लागली व लोक स्वामीदर्शनास येऊ लागले. राजेसाहेब भोसले यांचीही श्रीस्वामींवर दृढ भक्ती झाली. श्रीस्वामी समर्थ राजवाडयात कधी कधी जात व एखादे वेळी त्यांचा राजवाड्यातच चारचार दिवस मुक्काम असे.
अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. (हे खंडोबाचे देऊळ सध्याच्या एस. टी. स्टॅंडसमोर आहे.) तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तप:साधना केली. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले. राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. “आपण यजुर्वेदी ब्राह्मण, गोत्र काश्यप, रास मीन,” असल्याची माहितीही त्यांनी स्वत:च सांगितली आहे. शिष्यद्वय श्रीबाळप्पा व श्री चोळप्पा यांचेवरही त्यांनी कृपा केली.
सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले. सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्याभोवती गोळा झाले. त्यांचे बाह्य़ आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते. त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला. अनेकांना सन्मार्गाला लावले. ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली. निर्भीडता, स्पष्टवक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले. त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांचा अंमल होता. इंग्रज शासनाच्या वरवंटय़ामध्ये जनता भरडत होती. तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला.
त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान, ख्रिश्चन इ. धर्माचे लोकही सामील होते. त्यांच्याभोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता. प्रत्येक शिष्याला त्यांनी त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची पताका दिली. श्रीस्वामी समर्थाच्या विविध शिष्यांद्वारे श्रीस्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे. यातील प्रमुख शिष्य कोल्हापूरचे कुंभार स्वामी, पुण्याचे बिडकर महाराज, मुंबईचे श्रीतात महाराज, आळंदीचे श्रीनृसिंहसरस्वती, श्रीशंकरमहाराज श्रीवामनबुवा, श्रीगुलाबराव महाराज, श्री केळकरबुवा, श्रीस्वामीसुत, श्रीआनंदभारती, श्रीगजानन महाराज, दिंडोरीचे श्रीमोरेदादा, श्रीआनंदनाथ महाराज हे आहेत. या शिष्यांनी विविध ठिकाणी श्रीस्वामी समर्थाचे मठ स्थापन केले आहेत. तसेच श्रीस्वामी मंदिरे आणि सेवा केंद्रे सुरू केली आहेत.
महाराजच आपल्या नकळत ह्र्दयासनावर येऊन बसतात. ते आपला योगक्षेम तर पहातातच त्याचबरोबर अनेक दुर्धर प्रसंगात, संकटात-दु:खात आपली काळजी घेऊन ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ ह्या आश्वासनाची प्रचीती देतात. आपल्यावर कृपा करतात आणि आपल्याजवळच असल्याची खुणगाठ ‘नामावताराने’ देतात. एक महान ग्रंथ म्हणजे ‘श्रीगुरुलीलामृत’. श्री स्वामीसमर्थ, अक्कलकोट स्वामींच्या सर्व भक्तांना ज्ञात असलेला असा हा सोपा, सुबोध ग्रंथ आहे. या ग्रंथात स्वामींच्या अनेक ‘लीला’ वर्णिल्या आहेत. त्यात चमत्कार कथांचाही समावेश आहे.
श्री वटवृक्ष मंदिर
अक्कलकोटचा विकास मुख्यत्वे करून या श्री वटवृक्ष मंदिर मंदिराचे व्यवस्थापनाने झाल्याचे दिसते. येथे एक भव्य स्वामी मंदिर आहे. त्यात मुख्यतः श्रीच्या पादुका, शिवलिंग, स्वामींच्या स्मृती वस्तु, प्रवचन हॉल छोटीशी निवास व्यवस्थाही आहे. या परिसरात प्रवेश करताच मन स्वामीचरणी गुंतून जाते. स्वामींनी अनेक लीला याच परिसरात केलेल्या आहेत. या परिसरात वटवृक्षा खाली छोटयाशा मंदिरात स्वामींच्या पादुका आहेत त्याला कांन लावल्यावर अनेक वादयांचे आवाज येतात असा भक्तांचा अनुभव आहे.
स्वामींचा त्यांचे जीवन कालात सर्वत्र वावर होता पण जास्त येथे व चोळप्पाचे मठात होता. अनेक सिद्ध पुरुष त्याकाळी व नंतरही या ठिकाणी येऊन गेल्याने हे पावित्र्य वाढलेलेच आहे. वटवृक्ष मंदिरातही सकाळी अभिषेक, रुद्रापठण चालते. येथे अनेक जुने फोटो लावलेले आहेत. येथेच मारुती मंदिर, व शिव पिंड आहे. सातत्याने येथे भजन कीर्तनाचे व आध्यात्मिक प्रवचनेही चालतात. त्रिकाल आरती होते.
जवळच संस्थानचे ऑफिस आहे. तसेच गाणगापूर रस्त्याला अद्ययावत असे भक्तनिवास ५-६ इमारती स्वरूपात भक्तांच्या सेवेस हजर आहे. तेथे छोटेखानी उपहार गृह आहे. येथेच स्वामींचे कायमस्वरूपी संग्रहालय आहे यात स्वामींच्या जीवनदर्शन घडवणारे फोटो व वस्तू आहेत. त्यातील काही फोटो अचम्बीत करतात. येथेही स्वामींची एक मूर्ती आहे. येथे पार्किंग व राहण्याची उत्तम सोय आहे.
वटवृक्ष संस्थान मठ, अक्कलकोट
श्रींनी अक्कलकोटच्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात बराच काळ जेथे घालवला त्या वटवृक्षाखालीच श्रींचे शिष्य जोतिबा पांडे यांनी मंदिर बांधले. श्रीसमाधिस्थ होण्यापूर्वी जोतिबाने श्रींना विचारले, “माझे कसे होईल?’ श्रीम्हणाले, “तुम्ही वडाच्या पारंब्या धरून बसा. मी सदैव वटवृक्षाखाली आहे. माझे स्मरण करताच तुमच्या सन्निध आहे.” श्रींच्या हयातीत जोतिबाने 15 वर्षेव समाधीनंतर 41 वर्षेअनन्यभावे सेवा केली. आज मंदिराच्या समोर सभागृहात श्रींची मूर्ती असून, त्यांचेशिष्य जोतिबा यांची उभी मूर्ती आहे. अशीही गुरुशिष्यांची जोडी आहे.
आता या मठाची व्यवस्था श्रीस्वामी समर्थ वटवृक्ष संस्थानामार्फत केली जाते. येणाऱ्या भाविकांस पूजा, नैवेद्य,अभिषेक तसेच राहण्याची, भोजनाची व्यवस्था, खोल्या देऊन या संस्थानामार्फत केली जाते. श्रीनेहमी म्हणत, “आमचे नाव नृसिंहभान – दत्तनगरमूळ’ त्यातील सर्व गोष्टी येथे परिपूर्ण आहेत. यामठात श्रींच्या जागृत पादुका असून मठात गुरुपौर्णिमा, दत्तजयंती, स्वामी पुण्यतिथी वगैरे उत्सव संपन्न होतात.
या क्षेत्री असे जावे :
अक्कलकोट हे सोलापूर पासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. सोलापूरहून अक्कलकोटसाठी नियमीत बससेवा आहे. इथे राहण्यासाठी भक्त-निवास आहे व अन्नक्षत्र मंडळातर्फे दुपारी १२ व रात्री ८ वाजता महाप्रसादाची सोय आहे.
संपर्क : वटवृक्षस्वामी महाराज ट्रस्ट, अक्कलकोट, जि. सोलापूर फोन- (०२१८१) २२०३२१, भक्त निवास-२२१९०९.
श्रीदत्त क्षेत्र महिमा २० वे
||श्रीक्षेत्र लातूर|| श्री सदानंद दत्त मठ आणि निर्गुण पादुका
लातूर येथे औसा रोडवर दत्तनगर येथे प्राचीन श्री सदानंद दत्त मठ आहे. गुरुचरित्राच्या १४ व्या अध्यायात या स्थानाचा उल्लेख आहे. बालस्वामी महाराज यांनी हा मठ स्थापन केला आहे. नरसिंह सरस्वती यांचे शिष्य नंदिनामा यांच्या वंशातील हे सत्पुरुष होते.बालगोविंद नंद सरस्वती असे त्यांचे नाव होते.परंतु बाल वयातच संन्यास घेतल्यामुळे त्यांना बालस्वामी महाराज म्हणत असत. आठव्या वर्षी त्यांनी गायत्रीपुरश्चरण केले.वयाच्या १२ व्या वर्षी संन्यास घेतला आणि वयाच्या १४ व्या वर्षी दंडीयति हा सर्वश्रेष्ठ संन्यास मार्ग स्विकारला .गाणगापुर प्रमाणेच येथेही निर्गुण पादुका आहेत. बालस्वामीमहाराज यांनी एक वर्षे एकांतात राहून या निर्गुण पादुका तयार केल्या व त्यावर अनुष्ठान केले.त्यामुळे गाणगापुरयेथील निर्गुण पादुका प्रमाणेच येथेही भाविक भक्तांना अनुभव येतो असे म्हणतात.
संपर्क: श्री सदानंद दत्त मठ, औसा रोड, दत्तनगर,लातूर
फोन – (०२३८२) २४११३१ अमृत काका मोबाईल ९८५००४९५९९ / शशिकांत ८३७८८८५०३६
श्रीदत्त परिक्रमेत आज आपण श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार असलेल्या श्रीस्वामी समर्थ यांची लिलाभूमी असलेल्या श्रीक्षेत्र अक्कलकोट आणि श्रीक्षेत्र लातूर चे दर्शन घेतले.उद्या आपण श्रीक्षेत्र माहुर येथील जिथे साक्षांत दत्त प्रभु जन्मले ते परम पवित्र स्थान पाहू या!
(संदर्भ सौजन्य www.dattamaharaj.com /श्रीगुरुचरित्र)
संपादन प्रस्तुती: विजय गोळेसर मोबाईल ९४२२७६५२२७
Datta Parikrama Akkalkot Mahima by Vijay Golesar
Religious Swami Samarta Dattatray