दसरा अर्थात विजयादशमी
अश्विन शुक्ल दशमी अर्थात दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. त्यामुळे या दिवशी शुभ कार्यास सुरुवात करण्यास कोणती वेळ बघायची आवश्यकता नसते. नवरात्राचे नऊ दिवस नवदुर्गा शक्तीचे पूजन झाल्यावर दहाव्या दिवशी दसरा सण साजरा केला जातो.
दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय प्राप्त केला होता, अशी पौराणिक मान्यता आहे. म्हणून या सणाला विजयादशमी असे म्हणतात. आपले सर्व सणवार हे कृषी व निसर्ग चक्र यावर अवलंबून असतात. दसऱ्याला पिक काढणीचा शुभारंभ केला जातो. या दरम्यान काढलेले पीक धान्य पंधरा ते वीस दिवसात विकून त्याचा आनंद म्हणून दसरा नंतर २० दिवसांनी दिवाळी साजरी केली जाते.
दसरा हा ज्ञान- विद्या यांचा सन्मान करण्याचा सण आहे. म्हणून दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन यास विशेष महत्त्व आहे. युद्ध समाप्तीनंतर पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडांमध्ये लपवून ठेवली. त्यामुळे या दिवशी शस्त्र पूजन देखील केले जाते. चांगल्याचा वाईटावर विजय याचे प्रतीक म्हणून दसरा साजरा केला जातो.
दसऱ्याला बंगालमध्ये दुर्गापूजा यास विशेष महत्त्व आहे. पूर्वी युद्धाच्या मोहिमा दसऱ्याला आखत असत. त्याचे प्रतीक म्हणून सीमोल्लंघन केले जाते. सोन्याचे प्रतीक म्हणून दसऱ्याला आपट्याची पाने देऊन एकमेकांना शुभेच्छा देण्याची पद्धत आहे. परंतु वाढत्या वृक्ष कत्तलीमुळे ही पद्धत आपणच निसर्गाची जोपासना करण्यासाठी बदलली पाहिजे. याउलट या दिवशी अधिकाधिक आपट्याच्या झाडांची लागवड आपण केली पाहिजे.
साडेतीन मुहूर्तांपैकी महत्त्वाचा मुहूर्त असल्याने दसऱ्याच्या दिवशी नूतन वास्तू खरेदी, वास्तु प्रवेश, वाहन खरेदी, सुवर्ण खरेदी करण्याची परंपरा आहे. दसऱ्याच्या दिवशी कुलदेवता पूजन, दुर्गा पूजन, श्रीराम पूजन, शस्त्रपूजन, मुख्यद्वार पूजन, सरस्वती पूजन केले जाते. पूजेनंतर देवाला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो.
यंदा दशमी तिथी 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 06:52 पासून 15 ऑक्टोबर सायंकाळी 6.02 मिनीटापर्यंत आहे. तर विजय मुहूर्त 15 ऑक्टोबरला दुपारी 2.21 मिनीटांनी पासून 3.07 पर्यंत आहे.
सर्व वाचकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.