विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने नवीन अबकारी धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन धोरणानुसार दिल्लीतील खासगी दारू केंद्र दि. १ ऑक्टोबरपासून बंद होईल. याबाबत माहिती देताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, जुन्या धोरणाअंतर्गत विकली जाणारी दारूची दुकाने हळूहळू बंद केली जातील. नवीन उत्पादन शुल्क धोरणानुसार दिल्लीला ३२ झोनमध्ये विभागून परवाने वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आता दिल्लीत १७ नोव्हेंबरपासून नवीन अबकारी धोरणांतर्गत दुकाने उघडली जातील.
दि. १ ऑक्टोबर ते दि.१६ नोव्हेंबर पर्यंत फक्त सरकारी दुकानांमध्येच दारू विकली जाईल. खासगी दुकाने बंद करण्याचा निर्णय आणि दारू विक्री केंद्रावर दारूचा तुटवडा हा एक संक्रमणाचा काळ असेल. अशा स्थितीत सरकारी दुकानांमध्ये विक्री करणे ही समस्या राहणार नाही. सध्या दिल्लीतील २६० हून अधिक दुकानांचे परवाने खासगी मालकाच्या हातात आहेत. जुनी दुकाने १ ऑक्टोबरपासून बंद होतील आणि त्यांच्या जागी नवीन अबकारी धोरणांतर्गत जारी केलेले परवानाधारक १७ नोव्हेंबरपासून नवीन उत्पादन धोरणांतर्गत दुकाने उघडतील. गेल्या तीन-चार वर्षांत दिल्ली सरकारने अवैध दारू विकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी बरेच प्रयत्न केले आणि परिणामी गेल्या दोन वर्षांत सुमारे ७ लाख ९ हजार बाटल्या अवैध दारू पकडल्या गेल्या.
आता नवीन अबकारी धोरणामुळे या अवैध दारू माफियांवर पूर्णपणे नियंत्रण राहणार आहे. नवीन अबकारी धोरणामुळे या संपूर्ण व्यवस्थेत बरेच बदल होतील. कोणत्याही दारू दुकानासाठी, किमान ५०० चौरस फुटांचे दुकान असणे आवश्यक असेल. दुकानाचा कोणताही काउंटर रस्त्याच्या कडेला उघडणार नाही दुकानाबाहेर कायदा व सुव्यवस्था राखणे, स्वच्छता राखणे आणि तेथे चांगले वातावरण राखणे ही दुकानदारांची जबाबदारी असेल. कोणत्याही प्रकारे उघड्यावर दारूचे सेवन केले जाणार नाही. यासाठी दुकानदाराला सीसीटीव्ही बसवावे लागतील आणि सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करावी लागेल. त्याची जबाबदारी दुकानदाराची असेल.