नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्र.१ ने वेगवेगळया ठिकाणी केलेल्या कारवाईत दोघांना बेड्या ठोकत मोपेड दुचाकी व अल्टोकारसह सुमारे सात लाखाचा दारूसाठा जप्त केला आहे. त्यात हातभट्टीच्या गावठी दारूसह राज्यात विक्रीस बंदी असलेल्या परप्रांतीय मद्याचा समावेश आहे.
विधान सभा निवडणुकीत प्रलोभनासाठी तसेच कार्यकर्ते खुष ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात दारूचा वापर होतो. या पार्श्वभूमिवर एक्साईज विभागाने तस्करांना आपल्या रडारवर घेतले असून सर्वत्र छापे मारी सुरू आहे. तसेच भेसळ निर्मीतीचा शोधाबरोबरच बेकायदा मद्यवाहतूक रोखण्यासाठी सिमा भागासह ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. मंगळवारी (दि.५) अधिक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली कारवाई करण्यात आली. इगतपुरीतील खैरगाव येथून घोटी येथे मोठ्या प्रमाणात गावठी दारूच्या साठ्याची वाहतूक होणार असल्याची माहिती भरारी पथक क्र.१ ला मिळाली होती. त्यानुसार देवळे शिवारातील जि.प.शाळा परिसरात सापळा लावण्यात आला होता. एमएच १५ जेई ३४४० या मोपेड दुचाकीच्या तपासणीत ५५ लिटर गावठी दारूचा साठा पथकाच्या हाती लागला असून या कारवाईत पथकाने संतोष लहू पोकळे (रा.खैरगाव ता.इगतपुरी) या दुचाकीस बेड्या ठोकत त्याच्या ताब्यातील दुचाकीसह मद्यसाठा असा सुमारे ७५ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दुसरी कारवाई अंबोली हरसूल मार्गावरील वेळुंजे शिवारात करण्यात आली. केंद्रशासित दारूची बेकायदा वाहतूक होणार असल्याची माहिती भरारी पथक क्र. १ ला मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.६) पहाटे हॉटेल टायगर व्हॅली समोर सापळा लावला होता. चारच्या सुमारास भरधाव येणारी एमएच १५ एपएफ ७४३७ अल्टोकार अडवून पथकाने तपासणी केली असता त्यात दिव दमण निर्मीत ऑफिसर चॉईस ब्ल्यू व्हिस्कीचे बॉक्स आढळून आले. या कारवाईत सागर अशोक भोये (रा.हरसूल ता. त्र्यंबकेश्वर ) या चालकास बेड्या ठोकत पथकाने कारसह दारू साठा असा सुमारे सहा लाख ३० हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही गुन्ह्याबाबत दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास पथकाचे निरीक्षक विलास बामणे करीत आहेत. ही कारवाई आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी,अंमलबाजवणी व दक्षता विभागाचे सहआयुक्त प्रसाद सुर्वे,विभागीय उपायुक्त उषा वर्मा, अधिक्षक शशिकांत गर्जे व उपअधिक्षक सु.आ.तांबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बामणे,दुय्यम निरीक्षक गणेश नागरगोजे,रोहित केरीपाळे,सहाय्यक दुय्यम निरीक्षक पी.वाय.गायकवाड, जवान दिपक आव्हाड,संदिप देशमुख,व्ही.ए.चव्हाण, सागर पवार,अमन तडवी, अनिता भांड तसेच ड विभागाचे निरीक्षक एन.एच.गोसावी व त्यांच्या स्टाफने केली.