पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाने दारूबंदी सप्ताह निमित्त अवैध दारू निर्मीती, वाहतूक व विक्रीवर आळा घालण्याच्या दृष्टिने पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यात १७ लाख २७ हजार १६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने २ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत दारूबंदी सप्ताह राबविण्यात आला. या कालावधीत भरारी पथकाने विशेष मोहिम आखून जिल्ह्यातील अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती, वाहतूक व विक्री तसेच अवैधरित्या मद्य विक्री होत असलेल्या ढाब्यांवर सातत्याने छापे टाकून एकूण २२ गुन्हे नोंदविले.
या गुन्ह्यामध्ये १८ वारस व ४ बेवारस गुन्ह्यांचा समावेश असून एकूण १४ आरोपींच्या विरूद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यात १४ हजार ४०० लिटर रसायन, २ हजार ११५ लिटर गावठी हातभट्टी दारू, ४० ब. लि. देशी दारू, १० ब. लि. विदेशी मद्य, १६ ब. लि. बिअर तसेच अवैद्यरित्या दारू वाहतूक करणारी १ चारचाकी, १ तीन चाकी व ४ दुचाकी अशा ६ वाहनांसह अंदाजे १७ लाख २७ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुणे पथकाचे दुय्यम निरीक्षक अतुल पाटील, विराज माने, धीरज सस्ते, जवान पी.टी. कदम, आर.जे. चव्हाण, ए.आर थोरात, एस.एस. पोंधे, एस.सी. भाट, आर. टी. ताराळकर व ए. आर. दळवी यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.
यापुढे देखील अशाच मोहिमा आखून अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांवर सातत्याने छापे मारून कारवाई करण्यात येणार आहे. अवैध मद्य निर्मिती, विक्रीबाबत कोणास माहिती मिळाल्यास तात्काळ राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी केले आहे.