नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य उत्पादन शुल्क विभागाने जव्हार मार्गावरील वेगवेगळया ठिकाणी केलेल्या कारवाईत दोन वाहनांसह मद्यसाठा असा सुमारे २२ लाख १२ हजार २८० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या घटनेने सिमावर्ती भागातून राज्यात बंदी असलेली दादरा नगर हवेली या केंद्र शासित प्रदेशातील मद्याची वाहतूक राजरोसपणे सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे अवैध मद्यवाहतुकीला आळा घालण्यासाठी सीमावर्ती भागात गस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत. भरारी पथके शुक्रवारी (दि.१४) नाशिक जव्हार मार्गावर गस्त घालत असतांना अंबोली फाटा व तोरंगण शिवारातून अवैधरित्या मद्याची वाहतूक होणार असल्याची खबर पथकास मिळाली. त्यानुसार पथकाने अंबोली फाटा येथे किया कंपनीची सेल्टोस कार (जीजे २१ सीसी ३८३१) तर, तोरंगण शिवारात स्विप्ट कार (जीजे २१ एक्यु ७६५९) या वाहनांची तपासणी केली असता या दोन्ही वाहनांमधून बेकायदा मद्याची वाहतूक होत असल्याचे समोर आले. दोन्ही कारमध्ये दादरा नगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशात निर्मीत आणि राज्यात विक्रीस बंदी असलेला आढळून आला. पथकाची चाहूल लागताच चालक आपले वाहन सोडून पसार झाले असून या कारवाईत वाहनासह मद्यसाठा असा सुमारे २२ लाख १२ हजार २८० रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अधीक्षक शशिकांत गर्जे व उपअधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक एकचे निरीक्षक जे.एस. जाखेरे, दुय्यम निरीक्षक आर.व्ही. राऊळ, आर.सी. केरीपाळे, सुनील दिघोळे, शाम पानसरे, धनराज पवार, राहुल पवार, महेंद्र भोये आदींच्या पथकाने केली.