पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन काही दिवसात वनविभागात रुजू होणाऱ्या दर्शना पवार हिच्या हत्येबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दर्शना ही आपला मित्र राहुल हंडोरेसोबत १२ जून रोजी राजगडावर गेली होती. त्यावेळी राहुल हांडोरे याने तिची निर्घृण हत्या केली. भयानक गोष्ट म्हणजे दर्शनाने विवाहास नकार दिल्याने झालेल्या वादावादीनंतर रागाच्या भरात राहूलने सुरुवातीला कंपासमधील कटर ब्लेडने तीन ते चार वार केले. त्यावेळी कटरचा वार गळ्याला लागल्याने दर्शनाच्या गळ्यातून रक्तस्त्राव सुरु झाला. त्यानंतर डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची कबुली आरोपी राहुल हांडोरे याने पोलिसांना दिली. मात्र, माझा दर्शनाला मारण्याचा हेतू नव्हता. अनावधानाने हे कृत्य घडले, अशी माहिती आरोपी राहुलने चौकशी दरम्यान पोलिसांनी दिली आहे.
सगळंच सांगून टाकलं…
खूनाची कबुली देताना राहूल म्हणाला की, आम्ही दोघे एमपीएससीच्या परीक्षेची तयारी एकत्र करत असताना मी तिला मदत केली. मात्र एमपीएससी परीक्षा पास झाल्यावर दर्शनाने विवाहास नकार दिला. राग आल्याने मी तिला संपवायचे ठरविले, असे आरोपी राहुल हंडोरने चौकशीत सांगितले. दर्शना पवारच्या खून प्रकरणात ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपी राहुल हंडोरेला मुंबईतून अटक केली. दर्शनाचा खून केल्यानंतर तो परराज्यात पसार झाला होता. त्यापुर्वी दर्शना आणि राहुल राजगड येथे गेले होते. गडावरुन राहुल एकटाच उतरल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळून आले होते. १८ जून रोजी दर्शनाचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याला सापडला होता. दर्शना १२ जूनपासून बेपत्ता झाली होती. ती बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिसांकडे दिली होती. आता आरोपी राहुल हंडोरे न्यायालायने गुरुवारपर्यंत (२९ जून) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कुजलेल्या अवस्थेत मृतदेह
दर्शनासोबत तिचा मित्र राहुल हंडोरे हा सोबत गेला होता. राजगडावर गेल्यानंतर काही वेळाने तो एकटाच गड उतरल्याचे सीसीटीव्हीमधून समोर आले होते. त्यामुळे राहुलवर संशय व्यक्त केला जात होता. कारण त्यानेच दर्शनाचा खून केला होता. त्यानंतर गावातील काही नागरिक त्या भागाकडे गेले असता त्यांना तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी लागलीच वेल्हे पोलिसांना कळवून घटनास्थळी धाव घेतली, मृत देहाचे वर्णन संबधीत कुटुंबाला सांगितले, त्या आधारे मृत देहाची ओळख पटविण्यात आली.
म्हणून राहुल अस्वस्थ
खरे तर राहुल हांडोरे हा मुळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर लातुक्यातील शाहवाडी गावाचा आहे. तो पुण्यात एमपीएससी ची तयारी करत होता. मागील काही महिन्यांपासून दोघेही एकमेकांच्या चांगल्या संपर्कात होते. तसेच दर्शना आणि राहूल हे एकमेकांचे नातेवाईक होते. दर्शनासोबत लग्न करण्याची राहूलची इच्छा होती. मात्र दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे राहूल हंडोरे अस्वस्थ होता. त्यातूनच राहूलने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केली.