नाशिक – कच्चामाल आणि विविध प्रकारच्या केमिकल्स दरामध्ये गेल्या तीन महिन्यापासून सतत वाढ झाल्यामुळे नाशिक कलर अनोडायझिंग युनियनने आपले दर १ ते ३ रुपये प्रती स्क्वेअर फूटने वाढ केली आहे. अनोडायझिंग युनियनचे अध्यक्ष मनोज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.. सदर बैठकीस निलेश चाळीसगावकर मुर्तुजा शेठ, युसुफ शेख, रवी पाटील, रवी शेट्टी, समाधान पवार ,अमोल मढवई , पलाश पाटील, सुनील कदम इत्यादी उपस्थित होते. यापूर्वी केमिकल्सचे दर पूर्वी १८०० रुपये होते ते आता ४५०० रुपये झालेत, अल्युमिनियम २५० रुपयांवरून ४०० रुपये वाढले इतर कच्चा माल देखील ४० टक्केने वाढला त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे मनोज पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, आमच्या दरात गेल्या तीन वर्षांपासून वाढ झालेली नसल्याने सतत तोटा होत होता. त्यामुळे आम्ही सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतला.










