मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दापोली येथील मुरुड तालुक्यातील साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने आज आणखी एकाला अटक केली असून लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. रिसॉर्टच्या बांधकामासाठी बेकायदेशीररित्या परवानगी दिल्याप्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.
मुरुड तालुक्यातील साई रिसॉर्टचे प्रकरण आता चांगलेच गाजत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाला तोंड फोडले आणि सर्वांत आधी ईडीने ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर चौकशीचा बडगा उगारला. त्यानंतर अनेक वेगवेगळ्या लोकांच्या या प्रकरणात चौकश्या झाल्या. तर काही बड्या मासे गळाला लागण्याची शक्यता असल्याने ईडीने त्यांच्यावरही नजर ठेवली होती. यात ठाकरे गटाचे आमदार सदानंद कदम यांना गेल्या आठवड्यात ईडीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची कसून चौकशी झाली. या चौकशीनंतरच ईडीने आज तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांनाही ताब्यात घेतले आहे.
साई रिसॉर्टच्या बांधकामाला बेकायदेशीररित्या परवानगी दिल्याच्या प्रकरणात त्यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. साई रिसॉर्ट प्रकरणात लागोपाठ दोन लोकांना अटक झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यापूर्वी जयराम देशपांडे यांना सरकारनं निलंबित केलं होतं आणि चौकशी सुरू केली होती. पदावर असताना बेकायदेशीर कार्यवाही केल्याबद्दल त्यांचे निलंबन करण्यात आले होते.
न्यायालयात करणार हजर
जयराम देशपांडे यांना अटक करून ईडी न्यायालयात हजर करणार आहे. त्यामुळे आता त्यांच्या चौकशीची परवानगी मिळाल्यानंतर ईडी देशपांडे यांच्याकडूनही बरीच माहिती प्राप्त करू शकते. त्यामुळे आणखी काही नावे या प्रकरणात पुढे येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
काय म्हणाले होते परब?
देशपांडे यांना सरकारने निलंबित केल्यानंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांच्यावर आगपाखड केली होती. सोमय्या सर्वांना उध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. साई रिसॉर्टशी माझा राजकीय संबंध जोडून बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे, पण इतरांच्या नुकसानाची जबाबदारी सोमय्या किंवा सरकार घेईल का, असा सवाल त्यांनी केला होता.
Dapoli Sub Divisional Officer Jairam Deshpande Arrested